नाशिक : गेल्या लोकसभा निवडणुकीत शरीराने सोबत असलेल्या छगन भुजबळ यांनी महायुती धर्म न पाळता प्रत्यक्षात विरोधी उमेदवाराला मदत करून आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा घनाघात माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केला. राष्ट्रवादी अजित पवार गट भुजबळ कुटुंबीयांवर मेहेरबान का, याचे आश्चर्य वाटत असल्याचा घनाघात करीत गोडसे यांनी, पुढील आदेश येईपर्यंत देवळालीत महायुती उमेदवाराच्या व्यासपीठावर न जाण्याचा सल्ला पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज आहिरे या महायुतीच्या उमेदवार असताना पक्षाच्या राजश्री अहिरराव यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 5) शिंदेसेनेचा मेळावा पार पाडला. यावेळी बोलताना गोडसे यांनी भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, भुजबळ लोकसभेसाठी नाशिकमधून इच्छुक होते. आपली उमेदवारी थेट दिल्लीतून जाहीर करण्यात आल्याचे ते सांगत होते. नंतर मात्र उमेदवारीला उशीर होत असल्याचे कारण पुढे करून त्यांनी निवडणूक रिंगणातून पळ काढला. त्यानंतर पक्षाने आपली उमेदवारी जाहीर केली, तेव्हा भुजबळ सोबत असल्याचे दर्शवत राहिले. प्रत्यक्षात त्यांनी विरोेधी उमेदवाराला मदत केली. हातावर ३ वाजेला मतदान करा, असे लिहिलेला पुरावा त्यासाठी पुरेसा असल्याची तोफ गोडसे यांनी डागली.
जिल्ह्यातील एका मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने बंडखोरी करून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत आणले आहे. मग युुती धर्म फक्त शिंदेसेनेनेच पाळायचा का? असा सवाल गोडसे यांनी समीर भुजबळ यांचे नाव न घेता केला. मंत्रिपद, विधान परिषद सदस्यत्व, पाठोपाठ आमदारकीसाठी बंडखोरी हे सगळे पाहता राष्ट्रवादी अजित पवार गट भुजबळ कुटुंबीयांवर इतके प्रेम का दाखवतो, हे अनाकलनीय वाटते. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आपली भूमिका जाहीर करतील, तोपर्यंत पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्त्यांनी कोणाच्याही व्यासपीठावर जाऊ नये, असे आवाहन गोडसे यांनी मेळाव्यात केले.