मनमाड: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या ४ ते ५ तास उशिराने धावत आहेत. यामुळे ऐनवेळी प्रवासाचे नियोजन केलेल्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई-धुळे एक्सप्रेस, मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई-हिंगोली जनशताब्दी आणि मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या १९ ऑगस्ट रोजी मुंबईतून सुटणार होत्या, तर परतीच्या प्रवासातील गाड्या २० किंवा २१ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्याही विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना स्टेशनवर ताटकळत बसावे लागत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस: (२०७०६/२०७०५) मुंबई - जालना
जनशताब्दी एक्सप्रेस: (१२०७१/१२०७२) मुंबई - हिंगोली
सेवाग्राम एक्सप्रेस: (१२१३९/१२१४०) मुंबई - नागपूर
मुंबई-धुळे एक्सप्रेस: (११०११/११०१२)
मुंबई-बल्लारशाह एक्सप्रेस: (११००१/११००२)
अमरावती-मुंबई एक्सप्रेस (१२११२) नाशिकरोडपर्यंतच धावेल आणि परतीची गाडी (१२१११) २० ऑगस्ट रोजी मुंबईऐवजी नाशिकरोड येथूनच आपल्या नियोजित वेळेत सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे.