Heavy rains hit crops on 12,090 hectares in Sinnar
सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंदाजे १२ हजार ९० हेक्टर क्षेत्र वाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात मका, सोयाबीन, बाजरी आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने पंचनामे करण्यासाठी ग्रामस्तरीय समितीची स्थापना केली असून, या समितीकडून पंचनामे करण्यासाठी १३१ पालक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपासून या समितीमार्फत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्यास प्रारंभकरण्यात आला आहे.
तालुक्यात दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ११२ गावांतील सुमारे १८९०५ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला असून मका, सोयाबीन, बाजरी आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतपिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत. येत्या तीन ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश तहसीलदार देशमुख यांनी दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतुदी लागू होत असल्याने पालक अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्यात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास अथवा चुकीचे पंचनामे केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कलम ५२ अन्वये नागरी सेवा नियम १९७१ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सांगितले.
तालुक्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्यासाठी १३१ पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश पालक अधिकाऱ्यांना केले आहेत. सिन्नर, गोंदे, डुबेरे, देवपूर, नांदूरशिंगोटे, नायगाव, पांगरी बुद्रुक, पांढुर्ली, वडांगळी, वावी, शहा, सोनांबे या महसूल मंडळात येणाऱ्या गावांत कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामतलाठी यांच्या पालक अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
दिवाळीपूर्वीच नुकसानभरपाई अनुदान अदा करण्याचे नियोजन सरकारने केले असल्यामुळे पालक अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. जेणेकरून वेळेत अहवाल सादर होईल.- शशिकांत मंगरूळे, उपविभागीय अधिकारी