Ahilyanagar Unseasonal Rain Crop Damage Pudhari
नाशिक

Nashik Heavy Rain Crop Damage | अतिवृष्टीमुळे 970 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

Nashik Heavy Rain Crop Damage | जिल्ह्यातील २,११८ शेतकऱ्यांना फटका : १२८ गावांमध्ये सोयाबीन, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागील आठवड्यात जिल्ह्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसाने बळीराजाचे अतोनात नुकसान केले आहे. गुरुवारी (दि. २३) झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १२८ गावांमधील तब्बल ९७०.१७ हेक्टर क्षेत्रावरील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यात सोयाबीन आणि भाजीपाल्याचा सर्वाधिक समावेश असून, जिल्ह्यातील २ हजार ११८ शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिरायती, बागायती आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून, यामध्ये नाशिक आणि निफाड तालुक्यांना निसर्गाच्या कोपाचा सर्वाधिक फटका बसला.

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, निफाड तालुक्यातील २१ गावांमधील १ हजार २७९ शेतकऱ्यांचे सर्वाधिक ६०२.३० हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले आहे, तर नाशिक तालुक्यातील ८९ गावांतील ५९० शेतकऱ्यांचे सुमारे २८०.६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. इतर तालुक्यांचा विचार करता, त्र्यंबकेश्वरमध्ये ४९ शेतकऱ्यांचे ६८.६० हेक्टर, इगतपुरीमध्ये १८४ शेतकऱ्यांचे १२.८२ हेक्टर, देवळा तालुक्यात ९ शेतकऱ्यांचे ३.६० हेक्टर आणि सुरगाणा तालुक्यातील ७ शेतकऱ्यांची ३ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

पिकांच्या प्रकारानुसार जिरायती क्षेत्रातील तब्बल ७०४.८२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यात एकट्या सोयाबीनचा वाटा ४६४.२० हेक्टर एवढा मोठा आहे. याशिवाय भाजीपाला (१००.४० हेक्टर), भात (८७.३२ हेक्टर) आणि मका (५२.६० हेक्टर) पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बागायती क्षेत्रात एकूण २६१.५० हेक्टरला फटका बसला असून, यामध्ये १६५ हेक्टरवरील ऊस आणि ९६.६० हेक्टरवरील भाजीपाल्याचा समावेश आहे, तर ४.५५ हेक्टर फळपिकांच्या नुकसानात प्रामुख्याने डाळिंब (४.४५ हेक्टर) आणि आंब्याचा (०.१० हेक्टर) समावेश आहे.

तत्काळ मदत द्यावी

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार या नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्यात येत आहेत. दरम्यान, नुकसानीचा प्राथमिक अहवाल पुढील कारवाईसाठी आणि भरपाईच्या नियोजनासाठी सादर केला असून, बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिरायती नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • मका - ५२.६०

  • सोयाबीन - ४६४.२०

  • भात - ८७.३२

  • भाजीपाला - १००.४०

बागायती नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • ऊस - १६५

  • भाजीपाला - ९६.६०

  • फळपिके - ४.५५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT