Sugar Factory  Pudhari
नाशिक

NASAKA Sugar Factory | 'नासाका' थकीत देण्यांवरून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार खडाजंगी; खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक

NASAKA Sugar Factory | खासदारांच्या सरबत्तीने घावटेंच्या प्रतिनिधींना घाम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकेकाळी हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक आधाराचा केंद्रबिंदू असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. नासाकावर सध्या शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी ९० लाख रुपये, तर कामगारांचे सुमारे १ कोटी ५० लाख रुपये वेतन थकीत असून, सुमारे १४ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कारखाना अंधारात आहे.

या संकटातून मार्ग काढण्यासाठी मंगळवारी (दि. १५) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कारखाना चालवायला घेतलेले संचालक प्रसाद घावटे यांचा प्रतिनिधी आणि शेतकरी व शेतकऱ्यांची बाजू मांडणारे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीला खा. भास्कर भगरे व जिल्हा बँक प्रशासक संतोष बिडवई, सीईओ अरविंद शिंदे, व्यवस्थापक मिलिंद देवकुटे आणि नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड यांच्यासह शेतकरी आणि कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नासाका कारखाना चालवायला घेतलेल्या अष्टलक्ष्मी एनर्जी कंपनीने, राजगंगा शुगर्सचे संचालक प्रसाद घावटे यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले. ऊस घेऊन त्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे अदा न करता कारखाना बंद पाडल्याचा आरोप केला. नासाका भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

कंपनीने सुमारे १० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले; मात्र त्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेच नसल्याचा दावा केला. कंपनीने उसाला प्रतिटन ३,००० रुपये दर देण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ २,२५० रुपये दराने पैसे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. रोखीत पेमेंटचे आश्वासन दिल्याने आम्ही विश्वास ठेवून ऊस दिला; मात्र नंतर विश्वासघात झाल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

बैठकीत खा. वाजे यांनी आक्रमक भूमिका घेतली. बैठकीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रसाद घावटे उपस्थित नसल्याचे सांगत त्यांच्या प्रतिनिधीने उडवाउडवीची उत्तरे देत सर्व जबाबदारी अष्टलक्ष्मी कंपनीवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र खा. वाजे यांनी, शेतकऱ्यांचा ऊस कोणी घेतला? गाळप कोणी केले? साखर कोणी विकली? मग शेतकऱ्यांचे पैसे का दिले नाहीत? असे प्रश्न उपस्थित करीत प्रतिनिधीला धारेवर धरले.

प्रसाद घावटे यांनी स्वतः बैठकीला उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष तानाजी गायधनी यांच्यासह, कामगार प्रतिनिधी विष्णू गायकवाड, जगन आगळे, कैलास टिके, अर्जुन भोर, सुनील गायधनी, पंडित आवारे, शिवाजी म्हस्के, अरुण जाधव, बाबूराव मोजाड, संजय गायधनी आदी शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडूनही प्रश्नांची सरबत्ती, 17 सप्टेंबरला बोलावली पुन्हा बैठक

कारखान्यातील साखर, भुसा आणि राख विक्रीतून उत्पन्न मिळालेले असतानाही शेतकरी - कामगारांची देणी का भागविली नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घावटेंच्या प्रतिनिधीवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच या प्रकरणावर गुरुवारी (दि. १७) पुन्हा बैठक बोलावतानाच अष्टलक्ष्मी कंपनी सक्षम प्रतिनिधी व प्रसाद घावटे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही बजावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT