देवळाली कॅम्प (नाशिक): उन्हाची तीव्रता वाढत असताना पिकांना वेळेवर पाणी मिळावे म्हणून उन्हात पाइपलाइन दुरुस्तीचे काम भर उन्हात करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथे घडली.
तालुक्यातील शेवगे दारणा येथील शेतकरी जगदीश रघुनाथ कासार (४५) यांच्या शेतातील पाइपलाइन नादुरुस्त असल्यामुळे पिकांना पाणी मिळावे म्हणून ते रविवारी (दि. 4) सकाळपासून उन्हात काम करत होते. दुपारी 2 च्या सुमारास चक्कर येऊन ते शेतातच कोसळले. त्यांना कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत जगदीश यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
आज परिसरातील तापमान दुपारी 12 ते 1.30 च्या सुमारास 40 अंशांच्या आसपास होते. दुपारी उकाडा प्रचंड वाढला होता. तीव्र उष्मा असताना कासार दुपारपासून काम करत होते. परंतु अतिथकवा आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अचानक ताप भरला आणि चक्कर आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत वैद्यकीय आहवालानंतरच याबाबत स्पष्ट होणार आहे.