नाशिक : उन्हाचा वाढता चटका नाशिककरांसाठी 'ताप'दायक ठरत आहे. गेल्या २४ दिवसांतच शहरात तापसदृश आजाराचे तब्बल १,६०९ रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी फक्त महापालिकेपुरती मर्यादित असून, खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्येही तापसदृश रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.
उन्हापासून योग्य प्रकारे संरक्षण न केल्यास अशा प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे उन्हात घराबाहेर पडणे टाळणे व शरीराचे संरक्षण करणे, हाच प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, उष्माघाताचा शहरात एकही रुग्ण नसल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आला आहे.
कधी काळी थंड हवामानासाठी ओळखले जाणारे नाशिक यंदा एप्रिल महिन्यातच तापले असून, तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. उष्णतेच्या तीव्र झळांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होत असून, चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणा, भोवळ येणे, त्वचेचा दाह, पुरळ, डोकेदुखी, ताप, मळमळ व उलट्यांसारख्या तक्रारी समोर येत आहेत.
दि. १ ते २४ एप्रिलदरम्यान नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तापसदृश आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल १,६०९ इतकी नोंदवण्यात आली आहे. तापमानातील वाढ ही तापसदृश आजारांच्या वाढीमागील मुख्य कारण ठरत आहे.
भरपूर पाणी प्या. नारळपाणी, पाणीयुक्त पदार्थ आणि ज्यूस यांचा समावेश करा. बाहेर जाताना डोके आणि चेहरा व्यवस्थित झाका. दुपारच्या सुमारास शक्य तितके कमी बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. पचायला सोपे अशा हलक्या अन्नाचे सेवन करा, असे आवाहन वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.
उन्हापासून बचावासाठी वापरल्या जाणाऱ्या कूलर आणि फ्रीजच्या ट्रेमध्ये साचणारे पाणी डासांच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दि. १ जानेवारी ते २४ एप्रिलदरम्यान १०७ डेंग्यू रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३ रुग्ण फक्त एप्रिल महिन्यात आढळले आहेत. तसेच १९ चिकूनगुनिया आणि २ मलेरियाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत.