त्र्यंबकेश्वर (नाशिक): उन्हाचा तडाखा वाढत असून, तापमान चाळिशीपार जात असल्यामुळे अनेक नागरिकांना भोवळ येणे, चक्कर येणे, मळमळणे अशी उष्माघाताची लक्षणे जाणवत असल्यामुळे उपाययोजना म्हणून त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
राज्यात सध्या हवामानात कमालीचे बदल होत असून जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट आली आहे. तर राज्यातील चंद्रपूर, अकोला, नागपूर, जालना आणि बीड या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
येथे दररोज देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यातच आता सुट्यांचे दिवस सुरू झाल्यामुळे भाविक व पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, उन्हाचा चटकाही वाढल्याने उष्मघाताचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे भाविक- पर्यटकांसह नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षात ऊन लागल्याने घायाळ झालेल्या रुग्णांना तातडीने अत्यावश्यक उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कक्षात पंखा, एसी, एअर कूलर आणि तत्सम सुविधांसह ओआरएसची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, उष्माघाताची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करावा किंवा भरती व्हावे असे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार यांनी केले आहे.