पती-पत्नीने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपवली
घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
संतानप्राप्ती न झाल्यामुळे जीवनयात्रा संपविल्याची चर्चा
इगतपुरी (नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील सुधानगर येथे पती-पत्नीने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि.6) रोजी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश देविदास सावंत (वय ३८) आणि त्यांची पत्नी विशाखा दिनेश सावंत (वय ३३) यांनी नाशिकहून इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर बुधवारी (दि.6) रोजी सायंकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास जीवनयात्रा संपविण्याचे टोकाचे पाऊल उचलले. याबाबतची माहिती दिनेश यांचे वडील देविदास देवाजी सावंत यांनी घोटी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनेश सावंत हे इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कायमस्वरूपी नोकरीस होते. जीवनयात्रा संपविण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या दाम्पत्याला संतानप्राप्ती न झाल्यामुळे त्यांनी जीवनयात्रा संपविली असावी, अशी चर्चा सुधानगर परिसरात होत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे इगतपुरी तालुका व घोटी परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.