नाशिक : रामनवमीच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संविधान हाती घेऊन ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात प्रवेश केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आल्याची आठवण करून देत, सपकाळ यांनी श्री काळारामाचे दर्शन घेतले आणि मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांना संविधानाची प्रत भेट दिली.
यावेळी १९३० ते १९३५ या काळात डॉ. बाबासाहेबांनी तब्बल पाच वर्षे १७ दिवस केलेल्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाबाबतही सपकाळ म्हणाले, 'बाबासाहेबांना मंदिरात प्रवेश नाकारण्यासाठी चारही दरवाजे बंद केले होते. यावेळी दंगल होऊन डॉ. बाबासाहेब जखमी झाले होते. दुसऱ्या वर्षी ते गोलमेज परिषदेला गेले असता दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांनी सत्याग्रहाची धुरा सांभाळली.
इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी भूसंपादन करताना प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावीत अशी मागणी झाली. त्यासाठी १९१३ मध्ये पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले. सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा केला होता. त्यात मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार होते. मात्र, वक्फ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न असून, त्यामागे पद्मनाभ मंदिरातील प्रचंड सोन्यावर डोळा असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला आहे.
श्रीरामनवमीनिमित्त श्री काळारामाच्या दर्शनासाठी मंत्री, आमदार तसेच राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. एकाच वेळी माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत मंदिरस्थळी आले होते. यावेळी सपकाळ आणि राऊत यांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. मात्र भुजबळ, सपकाळ यांनी एकमेकांची भेट घेणे टाळल्याचे दिसून आले.