नाशिक : भोंदू प्रकरणात तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला असून, त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याची गेल्या दोन दिवसांपासून सखोल चौकशी सुरू आहे. खरातचे आर्थिक व्यवहार आणि त्याच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी केली जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे, सध्या त्याला अटक करण्यात आलेली नसून, चौकशीदरम्यान मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, शिर्डी येथील भूखंड बळकावल्या प्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतरांविरुद्ध सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कल्पना खरात सध्या फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांकडून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
हर्षवर्धन खरातची चौकशी करताना तपास यंत्रणांनी विशेषतः आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले आहे. नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ता, विविध ठिकाणी करण्यात आलेली गुंतवणूक, मोठ्या प्रमाणातील रोख व्यवहार याबाबत त्याच्याकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. तीन दिवसांपूर्वी भोंदू खरातच्या कर्मयोगीनगर येथील तृप्तबाला बंगल्यातून कल्पना खरातचा शोध घेत असताना, हर्षवर्धनला घरातून ताब्यात घेतले होते. मात्र, कल्पना खरात फरार झाली. या सर्व व्यवहारांचा स्रोत आणि त्यामागील आर्थिक साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अशोक खरातचा नेमका कोणाकोणाशी नियमित संपर्क होता, कोणत्या व्यक्तींशी त्याचे व्यावसायिक किंवा वैयक्तिक संबंध होते, याबाबतही हर्षवर्धनकडून माहिती विचारली जात आहे. या चौकशीमधून खरातच्या कथित जाळ्याचा विस्तार आणि त्यातील इतर संबंधितांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांकडून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी महत्वाचे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.