नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खरात भोंदूबाबा अशोक प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) मोठा धक्का बसला असून, आरोपी अशोक खरातच्या पत्नी पाठोपाठ मुलगा हर्षवर्धन खरात हा फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी हर्षवर्धनला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली होती.
चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अचानक त्याचा मोबाइल फोन 'नॉट रिचेबल' लागत असल्याने तो पोलिसांच्या नजरेआड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जर एसआयटी त्याला वारंवार चौकशीसाठी बोलवत होती तर तेव्हाच का ताब्यात घेतले नाही, यामुळे एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी हर्षवर्धनचा शोध घेण्यासाठी त्याच्या राहत्या ठिकाणी तसेच संबंधित ठिकाणी तपास सुरू केला असता तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे तो मुद्दाम फरार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीच या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातवरही गुन्हा दाखल झाला असून, तीदेखील पोलिसांना गुंगारा देत फरार आहे. या प्रकरणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी समोर येत असून, पोलिसांनी फरार आरोपींचा शोध वेगाने सुरू केला आहे.
चार दिवसांपूर्वी हर्षवर्धन खरातला यासाठी पथकाने तृप्ताबाला बंगला कर्मयोगीनगर, गोविंदनगर परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची चौकशी करून त्याला काही वेळातच सोडून दिले. त्यानंतर पुन्हा दोन दिवस त्यास चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यानंतर त्याचा फोन लागत नाही. तसेच, तपासात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दादा परीक्षेला गेला आहे
भोंदू खरातच्या कर्मयोगीनगर येथील घरी माध्यम प्रतिनिधी चौकशी व वार्तांकन करण्यासाठी गेले असता तेथील त्यांच्या वॉचमनने हर्षवर्धन दादा परीक्षेला गेला आहे, असे सांगितले.