Threat Call Pudhari File Photo
नाशिक

Harshad Patankar Gang | कारागृहातून पाटणकर टोळीची जीवे मारण्याची धमकी! फिर्याद मागे घेण्यासाठी पूर्वीच्या साथीदारावर दबाव

Harshad Patankar Gang | नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असतानाही सराईत हर्षद पाटणकर याची गुन्हेगारी टोळी सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असतानाही सराईत हर्षद पाटणकर याची गुन्हेगारी टोळी सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील फिर्याद मागे घेण्यासाठी पाटणकरच्या सांगण्यावरून त्याच्या दोन साथीदारांनी पूर्वीचा साथीदार असलेल्या नीलेश रणमाळे याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी मोरे मळा परिसरात नीलेश रणमाळे (३०, रा. रामवाडी, पंचवटी) याच्यावर हर्षद पाटणकर व त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला करून गोळीबाराचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर फरार असलेल्या हर्षद पाटणकर (रा. शरणपूर रोड) याला १८ मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट एकने गुजरातधून अटक करून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवाना केले होते.

फिर्यादीनुसार ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तन्मय कलकुंडे याने रणमाळे याला फोन करून, "भाईचा मेसेज आहे, केस मागे घे आणि ॲफिडेव्हिट करून दे, नाहीतर तुला मारून टाकू," अशी धमकी दिली.

त्यानंतर आदित्य नामदेव लष्करे याने इन्स्टाग्राम आयडीवरून कॉल करून पुन्हा जीवे मारण्याचा दम भरला. तपासात लष्करे आणि कलकुंडे हे काही दिवसांपूर्वी हर्षद पाटणकरला भेटण्यासाठी नाशिकरोड कारागृहात जाऊन आल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.

दरम्यान, नाशिकरोड कारागृहातून धमक्या दिल्याची ही पहिलीच घटना नाही. महिन्याभरापूर्वीही दीपक लोंढे याने कारागृहात आपल्यावर हल्ला करून धमकावल्याची तक्रार बाहेर आल्यानंतर पोलिसांकडे दिली होती.

विशेष म्हणजे नीलेश रणमाळे हा पूर्वी हर्षद पाटणकर टोळीचा सक्रिय सदस्य होता. मात्र, वर्चस्वाच्या वादातून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर तो विरोधी गटात गेला.

पोलिसांच्या नजरेतून बचाव करण्यासाठी गुन्हेगारांकडून आता सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम कॉलिंगचा वापर वाढत असल्याचेही या प्रकरणातून समोर आले आहे.

हर्षद पाटणकर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, शस्त्र बाळगणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT