नाशिक : शक्ती, पराक्रम आणि बलाचे प्रतीक, जितेंद्रीय पवनपुत्र हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहर व परिसरात शनिवारी (दि. १२) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महापूजा, महाआरती, सामूहिक हनुमान स्तोत्र तसेच चालीसा पठण, महाप्रसाद, भंडारा आदी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. सातपूर येथे यानिमित्त भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा होणार असून, व्यायामशाळांमध्येही महापूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
टाकळी येथील जागृत श्री मारुती देवस्थान व राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठात शनिवारी (दि. १२) पहाटेपासून दिवसभर श्री हनुमान जन्मोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ६.२४ वाजता मान्यवरांच्या हस्ते महापूजन व आरती होईल. ७ वाजता रूपाली कापरीकर यांचे कीर्तन, ७ ते ८ या वेळेत दुग्धपान, ८ वाजता आसावरी खांडेकर यांचे अभंग व भक्तिगायन, १० वाजता भजन सेवा, ११.३० वाजता देणगीदारांचा सत्कार, दुपारी १२ वाजता महाआरती, १२.३० पासून महाप्रसाद व भक्तिसंगीत यांसह दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार असून, भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश जगदीश दळवी, विश्वस्त अर्चना रोजेकर, ॲड. नागनाथ गोरवाडकर, प्रसाद चौधरी यांनी केले आहे.
के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या सरस्वतीनगर, बळी मंदिरजवळील कॅम्पसमध्ये पहाटे ५ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव व महापूजा होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत भजन व दुपारी १२ पासून भंडारा-महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सातपूर कॉलनीतील श्री दक्षिणेश्वर हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अंजनेरी येथून शनिवारी (दि. १२) सकाळी ५.३० वाजता पायी पावनज्योत आणून महापूजा होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत रक्तदान शिबिर होईल. सावरकरनगर येथील राज्य कर्मचारी सोसायटीतील संकटमोचन हनुमान मंदिरातही महापूजनासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सातपूर येथील जाणता राजा मैदानावर 'ए. जे. क्लासिक – २०२५' जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना सुमारे एक लाख रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी असल्याची माहिती नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड यांनी दिली आहे.