नाशिक : शहराची ध्वनिप्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. file photo
नाशिक

नाशिककरांचे कानावर हात! ध्वनिप्रदूषणामुळे कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने त्रस्त

पर्यावरणाचा अहवाल : निवासी, व्यापारी क्षेत्रातील ध्वनीमध्ये वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील ध्वनिप्रदूषणात झपाट्याने वाढ होत असून पंचवटी कारंजा, द्वारकासारख्या निवासी भागात तसेच मेन रोड, सीबीएस, त्र्यंबक रोड तसेच मुंबईनाका सारख्या व्यावसायिक भागांत ध्वनिप्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना न केल्यास नाशिककरांना बहिरेपणा, मानसिक आणि शारीरिक असंतुलन, हृदयविकार यासारखे आजार बळावण्याचा धोका पर्यावरण अहवालातून समोर आला आहे. (Shocking environmental report - Nashikkars at risk of developing diseases like deafness, mental and physical imbalances, heart disease)

नाशिक शहराचा पर्यावरण अहवाल नुकताच महासभेत सादर झाला. महापालिकेकडून दरवर्षी वायू, जल व ध्वनिप्रदूषणाची गणना करून त्यासंदर्भातील अहवाल तयार केला जातो. या अहवालानुसार स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक अशी बिरूदावली मिरवणाऱ्या या शहरात ध्वनिप्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनांनुसार शहराची निवासी, व्यापारी, औद्योगिक आणि शांतता क्षेत्र या चार झोनमध्ये विभागणी केली असून, ध्वनिपातळीची मानके प्रस्थापित करण्यात आली आहेत. त्यानुसार महापालिकेने एका खासगी संस्थेच्या माध्यमातून पंचवटी कारंजा, द्वारका या निवासी क्षेत्रातील, सातपूर व अंबड या औद्योगिक क्षेत्रातील, मेनरोड, त्र्यंबक रोड, मुंबई नाका, जुने सीबीएस या व्यापारी क्षेत्रातील तर इंदिरानगर परिसरातील अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल परिसरातील शांतता झोनची प्रातिनिधिक स्वरूपात ध्वनिपातळी मोजली. त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

पंचवटी कारंजा व द्वारका पसिसरात ध्वनिपातळी निर्धारित मानकापेक्षा मोठ्या प्रमाणावर अधिक असल्याचे आढळून आले. औद्योगिक वसाहतीतील ध्वनिपातळी मानकापेक्षा कमी असली तरी व्यापारी क्षेत्रातील ध्वनिपातळीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात रामकुंड, नाशिक रोड, गाडगे महाराज पुतळ्याजवळ, त्रिमूर्ती चौक व सातपूर, सिडकोसारख्या भागांत आवाजाची पातळी ८० डेसिबल्सपेक्षाही अधिक आढळून आली. दिवाळीत सीबीएस, पंचवटी, दहीपूल, सिडको, बिटको चौक सारख्या भागात ७४ डेसिबल्सपर्यंत आवाज वाढल्याचे दिसून आले.

त्वरित उपाययोजनांची गरज

वाढते औद्योगिकरण, रेल्वे, विमान, वाहने तसेच फटाके, ध्वनिक्षेपके, डीजे यामुळे शहरी भागांतील आवाजाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. ध्वनिप्रदूषणाचा परिणाम व्यक्तीच्या शरीरावर होत असतो. मानसिक व शारीरिक संतुलन बिघडू लागले आहे. ध्वनिप्रदूषणाचा प्राणी, पक्षी आणि वनस्पतीवरही परिणाम होतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याची शिफारस पर्यावरण अहवालातून करण्यात आली आहे.

ध्वनिप्रदूषणाची प्रत्यक्ष सरासरी स्थिती (डेसिबल्समध्ये)

निवासी क्षेत्र

  • ठिकाण - दिवसा - रात्री

  • पंचवटी कारंजा - ६९ - ५७.४

  • द्वारका - ७२.२ - ५८.५

औद्योगिक क्षेत्र

  • सातपूर एमआयडीसी ७३.१ - ६२.६

  • अंबड एमआयडीसी - ७१.६ - ६३.२

व्यापारी क्षेत्र

  • मेनरोड - ७२ - ६२.३

  • त्र्यंबक रोड - ७१.३ - ६१.५

  • मुंबई नाका - ६९.५ -५८.३

  • जुने सीबीएस - ७२ - ६२.२

शांतता क्षेत्र

  • अशोक मेडिकव्हर रुग्णालय - ४५.२ - ३४

या आहेत उपाययोजना...

  • वाहनांची नियमित तपासणी करणे

  • हॉर्नचा अनावश्यक वापर टाळावा

  • रात्री ९ नंतर ध्वनिक्षेपक व तत्सम उपकरणांचा वापर टाळावा

  • रुग्णालय, शैक्षणिक संस्थांमध्ये मोबाइलचा वापर टाळावा

  • शाळा, कॉलेज, रुग्णालय, न्यायालय, वाचनालय शांतता क्षेत्र घोषित करावे

  • रहिवासी भागात मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नयेत

  • जनरेटर संचांना ध्वनिरोधक खोलीत ठेवावे

  • कर्णकर्कश हॉर्नच्या वापरावर बंदी घालावी

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT