नाशिक : गुरू शिष्याला भरभरून ज्ञानच नव्हे तर जीवनविद्याही देत असतो. गुरू शिष्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे उभे राहतात आणि सर्वोत्तम शिष्य घडवण्यासाठी त्यांच्यातील गुणांना पैलू पाडतात. शिष्यही गुरूकडून विद्या अर्जित करून गुरूंचे नाव मोठे करत असतो. करिअरला, जगण्याला, विचारांना आकार देणाऱ्या गुरुंविषयी शिष्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना कृतज्ञता भाव व्यक्त केले.
प्राध्यापक, शिक्षकांनी मार्गदर्शन केले नसते तर करिअरचा मार्गच दिसला नसता. सी. ओ. बडगुजर, डॉ. सुचिता कोचरगावकर या प्राध्यापकांनी आयुष्याला आकार दिला. कामात व्यग्र राहावे, ज्ञानाने, माहितीने अद्ययावत राहावे, असे डॉ. काेचरकर यांनी शिकवले. पीएच.डी.साठी त्यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे संशोधन पूर्ण झाले. प्रा. अरुण बच्छाव सरांना एकदा विचारले होते की एखादा विषय शिकला तर त्यात काय स्कोप असेल? तेव्हा ते म्हणाले होते, तुम्ही जितका अभ्यास कराल तितकी नवी कवाडे खुली होतील. विषयाची व्याप्ती निर्माण करणे आपल्या हातात असते. त्यामुळे ज्ञान घेत रहा, अशा विधानांनी आयुष्य घडले. मानसशास्त्र विषयासाठी आलेल्या सर्वच गुरुंमुळे या पदावर शिक्षणसेवा करतोय.
- प्रा. डॉ. समीर लिंबारे, प्राचार्य, बिंदू रामराव देशमुख आर्टस् ॲंण्ड कॉमर्स (एलबीआरडी) महिला महाविद्यालय, जेलरोड.
परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळे शिल्पकलेत प्रवेश केला. गुरुंचेच शिल्प करण्याचे पहिले काम मिळाले हे भाग्य. शिल्पकार म्हणून माझे माध्यम 'माती' हीदेखील गुरुस्थानी आहे. एका माध्यमात प्रभुत्व मिळवले तर सर्वच माध्यमात काम करता येते. स्क्रॅप, मेटल, स्टोन, वूड, फायबर, धातूचे ओतकाम अशाच सर्वच माध्यमात शिल्प, कलाकृती करण्याचे भाग्य केवळ गुरू आशीर्वादानेच मिळाले. अनुभव हादेखील महत्त्वाचा 'गुरू'च!.
- यतीन पंडित, शिल्पकार
१३ वर्षांपासून मलखांब खेळत आहे. माझे खेळातील गुरू ऋषिकेश ठाकूर यांनी माझ्यातील खेळाडूला पैलू पाडले. या खेळात लवचिक शरीर आणि एकाग्रतेला महत्त्व आहे. गुरुंनी खेळात प्रावीण्य मिळवावे म्हणून नियाेजन करून सराव करून घेतला. खेळाला अधिक पैलू पाडावे म्हणून स्वत: अनुभवातून अर्जित केलेल्या विद्यांचे गुपित दिले. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सांघिक स्तरावर सुवर्ण, तर वैयक्तिक स्तरावर रौप्यपदके मिळवता आली. खेळाव्यतिरिक्त जीवनातील मूल्य, संस्कार, व्यवहारज्ञानाची कवाडे त्यांनी खुली करून दिली.
- कृष्णा अंबेकर, राष्ट्रीय पदक विजेता मलखांबपटू, नाशिक