गुलशनाबादकरांना कास पठाराची ओढ Pudhari Photo
नाशिक

गुलशनाबादकरांना कास पठाराची ओढ

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : सतीश डोंगरे

विविधारंगी फुलांसाठी कधीकाळी परिचित असलेले 'गुलशनाबाद' नंतरच्या काळात 'नाशिक' म्हणून नावारूपास आले. त्याकाळी येथील नागरिकांना फुलांची प्रचंड ओढ होती, जी आजही कायम आहे. होय, विविधारंगी फुलांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कास पठारावरील फुलांचा मेळा अनुभवण्यासाठी हजारोंच्या संख्येंनी नाशिककर कास पठाराला भेट देत असून, काही पर्यटन कंपन्यांकडून दर आठवड्याला याबाबतच्या सहली आयोजित केल्या जात आहेत. संपूर्ण सीजन दरम्यान दहा हजारांपेक्षा अधिक नाशिककर कास पठाराला सहकुटुंब भेट देत असल्याचे ट्रॅव्हल कंपन्यांचे म्हणणे आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगेतील एका पर्वतावर वसलेले सातारा जिल्ह्यातील कास पठारला जगभरातील पर्यटक भेट देतात. पठारावर बहरणाऱ्या विविध प्रजातींच्या फुलांची नोंद युनेस्को या जागतिक संघटनेनी घेताना २०१२ मध्ये हे पठार 'जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केले आहे. या पठाराच्या नावापासून ते येथील विविध प्रजातींचे फुले पर्यटकांसाठी नेहमीच कुतुहूलाचा विषय राहिले आहे. ज्वालामुखीपासून बनलेला खडक व त्याच्यावरच्या पातळ मातीच्या थरामुळे तसेच आजुबाजुच्या पोषक हवामानामुळे येथील आश्चर्य अनुभवण्याची मजा काही औरच असल्याने, आॅगस्ट महिन्यापासून पठरावर पर्यटकांचा ओढा सुरू असतो. नाशिकमधून संपूर्ण सीजनदरम्यान दर शनिवार आणि रविवार अशी दोन दिवसीय सहल आयोजित केली जाते. विशेषत: नोकरदार वर्ग या सहलींमध्ये सहभागी होतात. गटागटाने तसेच सहकुटुंब सहली काढल्या जात असल्याने, पर्यटन कंपन्यांकडून विशेष आॅफर्स उपलब्ध करून दिल्या जात आहेत. साधारणपणे दोन दिवसीय सहलीसाठी साडेपाच हजार रुपये प्रत्येकी आकारले जातात. यामध्ये जेवणासह निवास व्यवस्था केली जात असल्याने, सहकुटुंब भटकंती करण्याचा अनेकांकडून बेत आखला जात आहे.

बारा मोटाच्या विहिरीचे आकर्षण

दोन दिवसीय सहलीदरम्यान कास पठरावर साताऱ्यातील ठोसेघर धबधबा, चाळकेवाडीला अनेक नाशिककर पर्यटक भेट देणे पसंत करतात. तसेच बारा मोटाची विहिरीलाही नाशिक आवर्जून भेट देतात. कास तलाव, अजिंक्यतारा किल्ला, सज्जन गड, वासोटा किल्ला, कुमुदिनी तलाव, कोयना अभयारण्य, तापोळा, वजराई धबधबा, पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान या पर्यटनस्थळांना सहलीदरम्यान भेटी दिल्या जात असल्याने, साताऱ्यात सध्या पर्यटकांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे.

स्टेटसवर कास पठाराचा बोलबाला

कास पठाराला भेट दिल्यानंतर बहुतांश नाशिककर येथील फुलांच्या सानिध्यात टिपलेल्या छबी आपल्या स्टेटसवर ठेवतात. येथील स्वर्ग अनुभूतीचे किस्से अनेकांना सांगतात. याशिवाय ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून विविध आॅफर्स उपलब्ध करून दिल्या जात असल्याने, सध्या अनेक नाशिककरांकडून कास पठारावरील भटकंतीचा बेत आखला जात आहे.

६५० जातींचे फूले

कास पठारावर तब्बल ६५० जातींची फुले असून, त्यातील ३० प्रजातींचे फुले अशी आहेत जी केवळ कास पठारावरच बघावयास मिळतात. तसेच फुले आणि वनस्पती मिळून सुमारे ८५० वनस्पतीच्या प्रजाती याठिकाणी आहेत. सीतेची आसवे, हबे आमरी, तेरडा, सोनकी, मंजिरी आदी फुले लक्ष वेधून घेतात.

आॅगस्ट महिना लागला की, अनेकांकडून स्वत:हून कास पठार सहलींबाबत विचारणा होते. सहलीसाठी नोकरदार वर्गाचा अधिक आग्रह असतो. दर शनिवार, रविवारी सहलीचे आयोजन केले जाते.
- आशिष शिंपी, पर्यटन कंपनी चालक
कास पठार म्हणजे स्वर्ग अनुभूती होय. या पठाराला एकदा भेट दिली तरी, ताणतणाव दूर होतो. पठारावर फुलांच्या दुनियेत हरवण्याचा मजा काही औरच आहे.
- रवींद्र गायके, पर्यटक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT