दिंडोरी (नाशिक): तालुक्यातील वारे येथील शामलाताई बिडकर आश्रमशाळेतील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्मिळ गुईलेन बॅरे सिंड्रोमसदृश्य (जीबीएस) आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
गायत्री विलास गायकवाड (रा. देवपाडा, करंजाळी) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. २७ जुलै रोजी रात्री तिच्या बहिणीने आपल्या पालकांशी फोनवर बोलताना मोठ्या बहिणीचे पोट दुखत असल्याचे सांगत त्यांना भेटायला बोलावले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी (दि. २८), सकाळी तिला अचानक त्रास जाणवू लागला आणि कमरेखाली शरीर बधीर झाल्याचे निदर्शनास आले. शिक्षक आणि वडिलांनी तिला तत्काळ भनवड व नंतर वणी येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने 30 जुलैला तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (दि.१) तिचा मृत्यू झाला. तिच्या तपासणीअहवालातून तिला जीबीएस हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाल्याचे सांगितले जात आहे.
गांडोळे येथील शासकीय आश्रमशाळेत नववीची विद्यार्थिनी माया संदीप भोये (15, रा. टेंटमाळ) हि सकाळी प्रार्थनेदरम्यान अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. तिला तातडीने ननाशी आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसांत तालुक्यात दोन विद्यार्थिनींचा आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
भनवड आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा जीबीएस आजाराने मृत्यू झाल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत, त्यामुळे पालकांनी घाबरुन जाऊ नये. प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.कल्पेश चोपडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, दिंडारी, नाशिक.