नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रिंगरोड आणि महामार्ग क्र. २९ साठी जमीन संपादित करताना योग्य मोबदला मिळावा, बागायती जमिनींचे फेरसर्वेक्षण करावे आणि पर्यायी मार्गाचा विचार करावा, या मागण्यांसाठी बाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २७) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनाला घेराव घातला होता. जिल्हा नियोजन समितीची बैठक संपवून पालकमंत्री वाहनात बसत असताना, शेतकऱ्यांनी वाहनासमोर ठिय्या आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासना कडून होत नसल्याचा आरोप छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी यावेळी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री गिरीश यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री बाहेर पडताच रिंगरोड महाजन आणि महामार्ग क्र. २९ बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी गायकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांशी चर्चा केली.
पालकमंत्री महाजन यांनी सुरुवातीला निवडक शेतकरी प्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी भूसंपादन अधिकारी, नगररचना विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. त्यानंतर शनिवारी (दि.२८) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी केले. आंदोलनात सुभाष गायकर, प्रवीण पाटील, दीपक हगवणे, अक्षय कातड, सुदर्शन पाटील, संजय चुंबळे, संतोष सहाणे, शिवाजी डांगले, रोशन उगले आदी उपस्थित होते.
मोबदला फेरमूल्यांकनाचा प्रश्न प्रलंबित
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने केवळ मोबदल्याचा गुणांक एकवरून दोन करण्यासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रत्यक्षात जिरायत म्हणून नोंद असलेल्या जमिनींचे वस्तुस्थितीनुसार बागायती आणि अर्धबागायती क्षेत्र म्हणून फेरसर्वेक्षण, संबंधित गावांतील सर्वोत्तम खरेदीखतांच्या आधारे फेरमूल्यांकन तसेच भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम १०७ आणि १०८ नुसार वाढीव मोबदल्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही झालेली नसल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला.
विभागीय आयुक्तांच्या अहवालावर आक्षेप
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शासनाकडे सादर केलेल्या अहवालात आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेले पुरावे, निवेदने आणि आक्षेप यांचा योग्य समावेश नसल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश असतानाही प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी
गोवर्धन ते मखमलाबाद आणि विंचूर दळवी परिसरातील रिंगरोड आखणीमुळे घरे, बागायती जमीन, विहिरी आणि बोअरवेल बाधित होत आहेत. गवळवाडीमार्गे पर्यायी आखणी निश्चित करून नव्याने सर्वेक्षण करावे. कमीत कमी घरे आणि बागायती जमिनी बाधित होतील, अशा पद्धतीने मार्ग निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली. रिंगरोडची आखणी निश्चित करण्यासंदर्भातील फाइल उपलब्ध नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाला पाठविण्यात आल्याचा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.