नाशिक : निल कुलकर्णी
जीवनातील प्रत्येक टप्प्यांवर, डिझाईन, दृश्यकलेसह ललित कलांच्या आविष्कारातून सजलेल्या असंख्य उपयोगिता सहज वापरल्या जातात. असे एकही क्षेत्र नाही जिथे डिझाईन, चित्र, आकृती, रंगरेषांचा वापर केला जात नाही. त्यासाठीच डिझाईन आणि दृश्यकलेचे शिक्षण देणारे अनेक सरकारी तसेच अनुदानित ललित कला महाविद्यालयेही उघडली गेली.
कला अन् डिझाईन कुठल्याही क्षेत्राचा मूलभूत आणि अनिवार्य पाया असताना आज शासकीय ललित कला महाविद्यालयांतील गेल्या अनेक दशकांपासून रखडलेली कलाशिक्षक भरतीप्रक्रिया, साधन सुविधांचा अभाव आणि सरकारी अनास्था यामुळे ललित कला शिक्षणाचा दर्जा घसरल्याचे चित्र आहे. दुसरीकडे खासगी आणि अभिमत कला महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे.
सकाळी उठल्यापासून दिनचर्यतील शेवटचे काम पूर्ण करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर डिझाईनसह कुठली ना कुठली ललित कला मनुष्याचे जीवन सुंदर, सुरेख आणि सुकर करतेच. त्यासाठी चित्रकला, शिल्प, डिझाईन, प्रिंट मेकिंग या आणि अशा दृश्यकला शिकवणारी शासकीय ललित कला महाविद्यालये उभारण्यात आली. राज्यात मुंबईतील 'सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'सह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रत्येक एक याप्रमाणे चार कला महाविद्यालये आहेत जिथे चित्र-शिल्प कला पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. यासह अनेक अनुदानित कला महाविद्यालांमध्ये जीडी आर्ट, आर्ट टिचर डिप्लोमा असे शिक्षणक्रम शिकवले जातात. मात्र, अशा महाविद्यालयांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कायमस्वरूपी कलाशिक्षकांची भरती झाली नाही. कंत्राटी कलाशिक्षकांकडून शिकवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सरकारी शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. अनुदानित कला महाविद्यालयांमध्येही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे गेल्या ३० ते ३५ वर्षांत ललित कलेचा दर्जा घसरल्याचे अभ्यासक सांगतात.
दुसरीकडे अभिमत आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये बीएफए, एमएफएचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अभिमत विद्यापीठे, खासगी महाविद्यालयांमध्ये, अनुभूती, प्रात्यक्षिकांवर आधारित स्वतंत्र व कालानुरूप शिक्षणक्रम, शिक्षण पूर्ण होण्याआधी प्रशिक्षण (इम्पांट ट्रेनिंग), तज्ज्ञ प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी, मूलभूत शैक्षणिक सेवा-सुविधांसह स्टुडिओ आदी सुविधांमुळे अशा महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. व्यक्तिचित्रणासाठी खासगी स्टुडिओबेस्ड 'अटेलिअर' संस्थामध्येही शिक्षण घेण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे.
शासकीय कला महाविद्यालयातील कला शिक्षणाची दुर्दशा झाली. 'जे. जे.'मध्ये १६० जागा रिक्त असताना केवळ चार शिक्षक कायमस्वरूपी आहेत. कंत्राटी शिक्षकांवर शिक्षणाची भिस्त असून, त्यांच्याकडून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा कशी करणार? आता शिक्षक भरतीसाठी एमपीएससीचा घाट घातला जात आहे. असेच चित्र राहिले तर खरंच दृश्य कलाकार तयार होतील का?सतीश नाईक, ज्येष्ठ चित्रकार, पत्रकार, मुंबई
शासकीय कला कॉलेजचा शिक्षणक्रम काळानुरूप अद्ययावत होतच नाही. तिथे शिक्षकभरती नसल्याने दर्जा घसरला आहे. यासह प्लेसमेंटची सोय, प्रशिक्षण, आधुनिक सॉफ्टवेअर, संगणक प्रणाली, शिक्षणाव्यतिरिक्त उपक्रम, डिजिटायझेशनचा अभाव असतो. त्यामुळे विद्यार्थी खासगी कॉलेजेसला पसंती देत आहेत.प्रा. डॉ. मिलिंद ढोबळे, अधिष्ठाता, एमआयटी 'सोफा' पुणे
दृश्य, ललित कलांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रात डिझाईन, कलेचा वापर होत आहे. प्रामाणिकपणे सातत्यने परिश्रम केल्यास फाइन आर्ट सारखे र्कीती, पैसा, प्रतिष्ठा देणारे अन्य क्षेत्र नाही.अमित ढाणे, व्यावसायिक चित्रकार, पुणे