Nashik Kumbh Mela 2027  Pudhari News Network
नाशिक

Eco friendly Nashik | कुंभमंत्र्यांच्या संकल्पनेतील 'हरित नाशिक' ला वेग

महापालिकेच्या माध्यमातून १५ हजार झाडांची लागवड अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

Green Nashik initiative gains momentum

नाशिक : 'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक सह हरित नाशिक' संकल्पना वास्तवात उतरविण्यासाठी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी हाती घेतलेल्या वृक्षलागवडीच्या मोहिमेला आता यश येऊ लागले आहे. या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून केली जाणारी १५ हजार झाडांची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील २० पेक्षा अधिक ठिकाणी ही वृक्षलागवड करण्यात येत असून, लागवड केलेली १०० टक्के झाडे जगल्याचा दावा महापालिकेचे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीच्या अगोदर तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा बराच गाजला. तपोवनात साधुग्रामसाठी प्रस्तावित जागेतील १,८२५ झाडे-झुडपे तोडण्याचा इरादा महापालिकेने जाहीर केल्यानंतर त्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी आंदोलन उभे केले होते. शिवसेना, मनसेसह विरोधी पक्षांनीही या आंदोलनात उडी घेतल्याने आंदोलनाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले.

या दरम्यान, कुंभमेळामंत्री महाजन यांनी सामंजस्याची भूमिका घेत तपोवनातील जुने वृक्ष तोडण्यात येणार नाहीत, असे जाहीर करताना या झाडांच्या बदल्यात १५ हजार नवीन झाडांची लागवड करण्याची घोषणा केली होती. महाजन यांनी स्वतः हैदराबाद येथील राजमुंद्रीला भेट देत १५ ते २० फूट उंचीच्या देशी प्रजातीच्या रोपांची निवड केली. त्यानंतर सीएसआर अंतर्गत या झाडांची खरेदी करत ती टप्प्याटप्प्याने नाशकात आणण्यात आली. २५ डिसेंबर रोजी साबू महतांच्या उपस्थितीत मखमलाबाद येथील भोईर मळा परिसरात या वृक्षलागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर हिरावाडी परिसरातील सात एकर जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.

गोदावरी नदीकाठी गोदा पार्कलगत, गंगापूर रोडवरील शिवशक्ती मैदान, मेरी रासबिहारी लिंक रोडवरील त्रिकोणी उद्यान, सिडकोतील पेलिकन पार्क, आडगाव शिवार सातपूरमधील चुंचाळे शिवार, कानेटकर उद्यान आदी २० हून अधिक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लागवड केलेल्या झाडांना पालवीदेखील फुटली आहे. त्यामुळे लवकरच या वृक्षराजी बहरणार असून, त्या माध्यमातून शहरात नये 'ऑक्सिजन झोन

देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड

कुंभमेळामंत्र्यांच्या संकल्पनेतून केल्या जाणाऱ्या या वृक्षलागवड मोहिमेंतर्गत देशी प्रजातीच्याच रोपांची लागवड केली जात आहे. यात वड, पिंपळ, जांभूळ अशा अनेक देशी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश असून, १५ फूट उंचीच्या रोपांची लागवड केली जात आहे.

मंत्री महाजनांकडून स्वतः पाहणी

हरित नाशिक मोहिमेसाठी कुंभमेळामंत्री महाजन यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, आधी घोषित केल्याप्रमाणे ते स्वतः वृक्षलागवड केलेल्या ठिकाणांची वेळोवेळी पाहणी करत आहेत. आतापर्यंत तब्बल दहावेळा वृक्षलागवडीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन करण्याचे निर्देश महाजन यांनी उद्यान विभागाला दिले आहेत

हरित नाशिक मोहिमेंतर्गत १५ हजार झाडांची लागवड अंतिम टप्प्यात आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवड मोहीम पूर्णत्वाकडे जात आहे. लागवड केलेली १०० टक्के झाडे जिवंत आहेत.
- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT