Birsa Munda Memorial 
नाशिक

Birsa Munda Memorial | दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण परिसरात उभारण्यात येणार भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक

Birsa Munda Memorial | त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त या स्मारकाची घोषणा करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उलगुलानचा लढा उभारणारे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण परिसरात साकारण्यात येणार आहे. त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त या स्मारकाची घोषणा करण्यात आली.

पाच एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या स्मारकात हातात धनुष्य घेतलेला २१ फुटी भव्य पुतळा उभारण्यात येणार असून, त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याला जिल्हा वार्षिक निधीचे योग्य नियोजन आणि वेळेत खर्च केल्याबद्दल राज्य शासन व मित्र संस्थेकडून मिळालेल्या आठ कोटी रुपयांच्या पारितोषिकापैकी चार कोटी रुपये या स्मारकासाठी वापरण्यात येणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग हा प्रकल्प राबवणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मागणीनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

हे स्मारक केवळ ऐतिहासिक स्मृती जपण्याचे ठिकाण न राहता, आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रेरणास्थळ ठरणार आहे. परिसरातील १० एकरापेक्षा अधिक जागेवर वृक्षारोपण करून जंगल विकसित केले जाणार आहे.

त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच ओझरखेड परिसरातील पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. एका वर्षात स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, दि. ९ ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनापूर्वी ते पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

नव्या पिढीला बिरसा मुंडांच्या संघर्षातून प्रेरणा मिळावी, आदिवासी समाजासह सर्व स्तरातील नागरिकांसाठी हे स्मारक प्रेरणास्थळ ठरावे, या उद्देशाने चार कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT