नाशिक : राज्यातील 1471 आणि नाशिक जिल्ह्यातील 202 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल आठवड्याभरात वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने 26 मार्चपर्यंत या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी अंतिम मतदारयादी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुमारे 30 दिवसांच्या आत निवडणूक होण्याची शक्यता असल्याने 26 एप्रिलच्या आसपास मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारयाद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.
राज्यातील 1673 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, 11 मार्चला आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. अंतिम अधिसूचना 24 मार्चला प्रसिद्ध होणार आहे. शासनाने 5 मार्च 2025 च्या अधिसूचनेनुसार पाच वर्षांसाठी सरपंच आरक्षण निश्चित केले आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारयाद्या तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 19 ते 24 मार्चदरम्यान हरकती व सूचना दाखल करता येणार असून, 26 मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील 202 ग्रामपंचायतींसह अन्य ठिकाणी पोटनिवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर आठ दिवसांत अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होईल, जी चार दिवस चालेल. त्यानंतर एक दिवस छाननी आणि दोन दिवस अर्ज माघारीसाठी असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 21 दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे 26 एप्रिलच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे.
ज्या तालुक्यांमध्ये 50 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे, तिथे संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू होईल. अन्यथा, निवडणुकीतील ग्रामपंचायतींच्या शेजारील गावांपुरतीच आचारसंहिता मर्यादित राहील. त्यामुळे महिनाभर विकासकामे ठप्प राहण्याची शक्यता आहे.
इगतपुरी -65
निफाड -32
बागलाण -30
त्र्यंबकेश्वर -18
कळवण -14
मालेगाव -12
येवला -08
नांदगाव -08
नाशिक -07
दिंडोरी -04
चांदवड -01
पेठ -01
देवळा -02
एकूण-202