नाशिक कळवण
कळवण : शहर हद्दीतील शासकीय निवासस्थानांची झालेली दयनीय अवस्था.  (छाया : बापू देवरे)
नाशिक

Nashik News | शासकीय निवासस्थाने भग्नावस्थेत; देखभाल - दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कळवण : येथे काही दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या विविध विभागांच्या शासकीय निवासस्थानांची दयनीय अवस्था झालेली आहे. पाटबंधारे, पोलिस, पंचायत समिती आदी विभागांची शासकीय निवासस्थाने रिकामी पडली आहेत. त्यांच्या देखभाल - दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष झालेले आहे. डागडुजीची कामे करून निधी खर्ची पाडला जात असल्याचाही आरोप होत आहे.

कळवण पोलिस ठाण्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी १८ निवासस्थाने तयार करण्यात आली होती. त्यांची दैना झाली आहे. पाटबंधारे खात्याचे २२ फाटा येथील निवासस्थान अखेरच्या घटका मोजत आहे. भिंतीना तडे गेलेत, दरवाजे- खिडक्या तुटल्या असून, कौले बेपत्ता होऊन, गाजर गवत वाढले आहे. एकूणच परिस्थिती राहण्यायोग्य राहिलेली नाही.

कळवण : शहर हद्दीतील शासकीय निवासस्थानांची झालेली दयनीय अवस्था.

पोलिस अधिकारी व ३० कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात. घरभाड्यात खूप वाढ झाली असली, तरी त्या तुलनेत शासनाकडून अत्यल्प घरभाडे मिळते, असे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या निवासस्थानासाठी जमीन प्रस्तावित करण्यात आली. गावाबाहेर कोल्हापूर फाटा येथे शासकीय निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांना ३० हून अधिक वर्षे झालीत, तरी ती निवासस्थाने वापराविना पडून आहेत. त्याठिकाणी आता गुरे बांधली जातात. पंचायत समितीच्या सहा शासकीय निवासस्थानांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. एकूणच तालुका मुख्यालयीची शासकीय निवासस्थाने भग्नावस्थेत गेली आहेत.

लेटलतीफपणा वाढतोय

या निवासस्थानांच्या बांधणीनंतर देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे आजघडीला ती दुरुस्तीयाेग्यही राहिलेली नाहीत. परिणामी, शासकीय कर्मचाऱ्यांना शहरात भाड्याच्या घरात राहावे लागते. बहुतांश कर्मचारी ये-जा करतात. त्यातून लेटलतीफपणा वाढलेला दिसतो तसेच जनतेची कामेही खोळंबतात.

शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, या उद्देशाने शासकीय निवासस्थाने बांधली. कार्यालयीन वेळा पाळल्या जाऊन जनतेची कामे त्वरित व्हावीत, असे अपेक्षित असते. पाटबंधारे, पोलिस, पंचायत समिती आदी विभागांसाठी शहरात मोक्याच्या जागी ही निवासस्थाने बांधली होती. तीच आता पडकी झाल्याने एकूणच हेतूला हरताळ फासला गेला आहे.

SCROLL FOR NEXT