नाशिक : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) इशाऱ्यानंतर महापालिकेची यंत्रणा हलली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी नाशिकरोड येथील जुन्या बिटको रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या इमारत दुरुस्तीसह सुविधानिर्मितीसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखाली नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या या वैद्यकीय महाविद्यालयासमवेत ४३० खाटांचे रुग्णालयदेखील सुरू केले जाणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात नाशिकरोड येथील महापालिका मालकीच्या जुन्या बिटको रुग्णालय इमारतीत तसेच नवीन इमारत अर्थात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून, लगतच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचारी निवासस्थानाच्या दोन इमारतींमधील २८ निवासस्थानांचा वापर वैद्यकीय महाविद्यालयाकरिता केला जाणार आहे. बिटको रुग्णालयाची जुनी इमारत जर्जर झाली असून, अनेक ठिकाणी इमारतीचे प्लास्टरदेखील कोसळले आहे. या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय सुरू करण्यासाठी जुन्या इमारतीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. ती इमारत वापरायोग्य करून हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने महापालिकेसमवेत करारनामा केला आहे. या इमारत नूतनीकरणाच्या प्रस्तावर महासभेने मागील फेब्रुवारीत प्रशासकीय मंजुरी दिली होती. मात्र, निविदाप्रक्रिया लांबल्याने काम सुरू होऊ शकले नव्हते, तर दुरुस्तीची कामे झाली नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयाकरिता आवश्यक निकषांनुसार सीसीटीव्ही कॅमऱ्यांची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नोटीस बजावली होती.
महापालिकेने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमवेत केलेल्या करारनाम्यानुसार बिटको रुग्णालयाची जुनी इमारत शिक्षणासाठी वापरायोग्य होण्यासाठी इमारतीची दुरुस्ती केली जाणार आहे. बाहेरील प्लास्टर काढून पुन्हा वॉटरप्रूफ प्लास्टर केले जाईल. ड्रेनेजलाइन टाकणे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रंगरंगोटी, विदयुत व अग्निप्रतिबंधक विषयक कामे केली जाणार आहेत.