नाशिक महानगरपालिका  file photo
नाशिक

आनंदाची बातमी ! नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिवाळीनिमित्त महापालिकेतील कायम अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सानुग्रह अनुदानाच्या रकमेत ३ हजार रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. मानधनावरील कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दहा कोटींचा बोजा पडणार आहे. (Sanugrah Anudan of Rs 20,000 each to the permanent officers, employees and Anganwadi employees of the Municipal Corporation on the occasion of Diwali)

दिवाळीनिमित्त महापालिकेतील स्थायी पदावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, फिक्स पे वरील कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्यसेविका,सेविका आणि मदतनिस, अंशकालिन शिक्षक, शिक्षण विभागातील कर्मचारी, एनयुएचएम, एनयुएलएम कर्मचारी, क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील कर्मचारी यांना वाढत्या महागाईनुसार २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेसह महापालिकेतील कर्मचारी संघटनांकडून आयुक्तांकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील ५५०० कायम, मानधनावरील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. शासन अनुदानातून मानधन घेणाऱ्या क्षयरोग नियंत्रण, हिवताप व एड‌्स नियंत्रण सोसायटी, बूस्टर पंपिंग स्टेशन, समग्र शिक्षा अभियान, एन.यु.एच.एम, एन.यु.एल.एम., आशा कर्मचारी, युनिसेफ अशा सहा महिेन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता.
सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना.

या अधिकाऱ्यांना लाभातून वगळले

सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल एस-१७ व त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सानुग्रह अनुदान दिले जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त, अतिरीक्त आयुक्त, उपायुक्त, अधीक्षक अभियंता, शहर अभियंता, आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य लेखापरिक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, यांना सानुग्रह अनुदान देय असणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT