Gold Silver Price Today Pudhari
नाशिक

Nashik Gold Silver Price | सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! सोने सव्वा लाखांवर, चांदी दीड लाखांच्या खाली

Nashik Gold Silver Price | चालू वर्षाच्या प्रारंभी उच्चांकी स्तर गाठलेल्या सोने आणि चांदीने नोव्हेंबरच्या प्रारंभापासूनच पुन्हा नीचांकी दरांकडे वाटचाल सुरू केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चालू वर्षाच्या प्रारंभी उच्चांकी स्तर गाठलेल्या सोने आणि चांदीने नोव्हेंबरच्या प्रारंभापासूनच पुन्हा नीचांकी दरांकडे वाटचाल सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून सोने-चांदीतील घसरण सुरूच आहे. सोने सव्वा लाख रुपये तोळा, तर चांदी दीड लाख रुपयांच्या आत आली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने, यजमान मंडळींना मोठा दिलासा मिळत आहे. सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी वर्दळ वाढत असल्याचे सध्या दिसून येत आहे.

गेल्या ११ नोव्हेंबरपासून सोने-चांदीच्या दरात सलग घसरण नोंदवली जात आहे. २३ नोव्हेंबरला सोने आणि चांदीच्या दरांत किंचित वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा मंगळवार आणि बुधवारी घसरण नोंदविण्यात आली आहे. सोमवारी (दि. २३) २४ कॅरेट सोने दर प्रतितोळा जीएसटीसह एक लाख २९ हजार ५७० रुपयांवर होते.

२२ कॅरेट सोने दर एक लाख १९ हजार २०० रुपयेइतका होता. चांदी प्रतिकिलो जीएसटीसह एक लाख ५८ हजार ४१० रुपयांवर होती. मंगळवार (दि. २४) आणि बुधवारी (दि. २५) सलग घसरण नोंदविण्यात आल्याने, सोने तीन हजार ६०० तर चांदी नऊ हजार ५८० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

बुधवारी २४ कॅरेट सोने दर प्रतितोळा जीएसटीसह एक लाख २५ हजार ९७० रुपये नोंदविण्यात आला. २२ कॅरेट सोने एक लाख १५ हजार ८९० रुपये, तर चांदी प्रतिकिलो जीएसटीसह एक लाख ४८ हजार ८३० रुपयांवर आली आहे.

चालू वर्षाच्या प्रारंभी चांदीने चार लाख २० हजारांचा टप्पा पार केला होता. सोनेदेखील दोन लाखांच्या नजीक पोहोचले होते. मात्र, आता सोने-चांदी दरांत घसरण होत असल्याने सोने-चांदी मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या लग्नसराई असल्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी दिसत आहे. दिवाळी संपली असली, तरी सोने-चांदी स्वस्त होत असल्याने सराफ बाजारात दिवाळीचा फीव्हर कायम आहे.

बुधवारचे दर असे (रुपये)

  • २४ कॅरेट सोने : प्रतितोळा - एक लाख २५ हजार ९७०

  • २२ कॅरेट सोने : प्रतितोळा - एक लाख १५ हजार ८९०

  • चांदी : प्रतिकिलो एक लाख ४८ हजार ८३०

दर कमी झाल्याने सोने-चांदी खरेदीची हीच उत्तम वेळ आहे. नव्या वर्षात दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संधी ओळखून सोने-चांदीत गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यायला हवे.-
चेतन राजापूरकर, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र, इंडिया बुलिअन अँण्ड ज्वेलर्स असो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT