नाशिक : दिवाळी, दसऱ्याच्या अगोदरच सोने-चांदीने दराचा नवा उच्चांक गाठला आहे. साेने ७७ हजार तर चांदीनेे ९२ हजारांचा आकडा पार केल्याने, दिवाळीत सोने खरेदी करताना मध्यमवर्गीय ग्राहकांचे दिवाळे निघणार आहे. दरम्यान, जाणकरांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करता दिवाळीपर्यंत सोने ८० हजार तर चांदी एक लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे.
२४ कॅरेट - प्रति दहा ग्रॅम - ७७ हजार ५० रुपये
२२ कॅरेट - प्रति दहा ग्रॅम - ७० हजार ६३० रुपये
चांदी - प्रति किलो - ९२ हजार ८०० रुपये
(दर जीएसटीसह)
वर्षाच्या प्रारंभी उच्चांकी ७५ हजारांचा दर ओलांडणाऱ्या सोन्यामध्ये अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयानंतर कमालीची घसरण झाली होती. सोने ७० हजारांवर आल्याने, सर्वसामान्यांंचा देखील खरेदीकडे कल वाढला होता. मात्र, फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेली कपात, मध्य पूर्वेतील भूूराजकीय परिस्थिती तसेच अन्य आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदी दराने पुन्हा एकदा दरात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. एेन दसरा, दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीने उच्चांकी स्तर गाठल्याने, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. सुवर्णकारांच्या मते, दिवाळीच्या मुहूर्तावर सोने ८० हजारांंच्या पार जाण्याची शक्यता आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठू शकेल.
आगामी सणांचा विचार करता, सोने-चांदी खरेदी मंदावण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. दसरा, धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन तसेच करवा चौथ या मुहूर्तांवर मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी केली जाते. मात्र, ज्या गतीने दर वाढत आहेत, त्यावरून सोने-चांदी खरेदी करताना ग्राहक हात आखडता घेण्याची शक्यता आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी (दि. १६) सोन्याचा दर प्रति तोळा ७४ हजार ९१० रुपये इतका नोंदविला गेला. बुधवारी (दि.२५) प्रति तोळा ७७ हजार ५०० रुपये इतका नोंदविला गेला असून, त्यात २१४० रुपयांची वाढ झाली आहे. सोने दरातील होत असलेेली वाढ लक्षात घेता सोने लवकरच ८० हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.
दहा दिवसांपूर्वी सोने प्रति किलो ९३ हजार रुपये इतके होते. बुधवारी (दि.२५) त्यात दोनशे रुपयांची घसरण होवून ९२ हजार ८०० रुपयांवर दर असल्याचे दिसूून आले. मात्र, चांदीच्या दरात ज्या गतीने वाढ होत आहे, त्यावरून चांदी लवकरच एक लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सोने-चांदीच्या दरात ज्या गतीने वाढ होत आहे, त्यावरून दिवाळीपर्यंत सोने ८० हजार तर चांदी एक लाखांच्या पार जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूकीची ही मोठी संधी आहे. सोने-चांदीच्या दरात वाढ हाेत असली तरी, ग्राहकांचा प्रतिसाद कायम आहे.- चेतन राजापूरकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, आयबीजे