सतीश डोंगरे
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने-चांदीमध्ये भांडवल गुंतवणाऱ्यांची संख्या मागील काही काळापासून वाढत असली तरी, गेल्या ११ दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सलग घसरण नोंदविली जात असल्याने गुंतवणुकीला काहीसा ब्रेक लागला आहे. घसरणीमुळे सोन्याचे सात तर चांदीचे मूल्य ११ टक्क्यांहून अधिक घटल्याने गुंतवणूकदारांसह सोने-चांदीचे दागिने असलेल्या कुटुंबांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सलग घसरणीमुळे प्रत्येकी हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे बाजारमूल्य तब्बल ४० ते ५१.२० कोटींनी घटले असून, दोन्ही धातूंमध्ये हे प्रमाणे २१.२० कोटी रुपये असल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
एका सर्वेक्षणानुसार, राज्यातील शहरी भागांमधील ७३ टक्के कुटुंबाकडे सोने-चांदीचे दागिने आहेत. विशेषतः चालू वर्षाच्या प्रारंभापासून सोने चांदीच्या दरांनी विक्रमी स्तर गाठण्यास प्रारंभ केल्यानंतर, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदीचा ट्रेंड वाढत गेला.
गुंतवणूकदारांबरोबरच श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी सोने चांदीत गुंतवणूक केल्यास वर्ष, दोन वर्षांत चांगला परतावा येईल या धारणेतून गुंतवणुकीला प्राधान्य दिले. मात्र, अवघ्या दहाच महिन्यांत सोने-चांदीचे दर कोसळण्यास सुरुवात झाल्याने आता घराघरांत चिंतेचे वातावरण बघावयास मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी २४ कॅरेट सोने दर प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख ५७ हजार ०७५ रुपयेइतका होतो. तर चांदी प्रतिकिलो जीएसटीसह दोन लाख ३८ हजार ९६० रुपयेइतका होता
गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आणि धास्ती
सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होणार की पुन्हा तेजी येणार, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. उच्चदरांत खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना सध्याच्या घसरणीमुळे मोठी मूल्यघट सहन करावी लागत आहे. तर नव्याने गुंतवणूक करू इच्छिणारे दर स्थिर होण्याची प्रतीक्षा करत आहेत. एकीकडे ग्राहकांसाठी कमी दरात खरेदीची संधी निर्माण होत असताना, दुसरीकडे मोठ्या गुंतवणूकदारांसाठी ही घसरण आर्थिक चिंतेचा विषय ठरत आहे.
तर ऑक्टोबरच्या प्रारंभी सोने एक लाख ५४ हजार ०८८ रुपये, तर चांदी दोन लाख ३२ हजार ५७० रुपयेइतका नोंदविला गेला. नोव्हेंबरच्या प्रारंभी मात्र २४ कॅरेट सोन्याचा दर थेट एक लाख ४२ हजार १४० रुपये, तर चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख ८७ हजार ९८० रुपयेडतका नोंदविला गेला. ६ नोव्हेंबरपर्यंत सोने-चांदी दरांत चढ-उतार असल्याने गुंतवणूकदार सक्रिय होते. ७ नोव्हेंबरनंतर मात्र दरांत घसरण सुरू झाली, ती २२ नोव्हेंबरपर्यंत कायम असल्याने, गुंतवणूकदार आता चिंतेत पडले आहेत. २२ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोने थेट एक लाख २७ हजार २०० रुपयांवर, २२ कॅरेट सोने एक लाख १७ हजारांवर, तर चांदी प्रतिकिलो एक लाख ५६ हजार ५६० रुपयांवर आल्याने सध्या घराघरांत चिंता निर्माण झाली आहे. दरातील ही घसरण आणखी काही काळ कायम राहणार असल्याचा अंदाज असल्याने, चिंतेत दिवसागणिक भर पडण्याची शक्यता आहे.
सोने-चांदी दरांतील घसरण
गुंतवणूकीसाठी मोठी संधी आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने यजमान मंडळींना सोने-चांदी खरेदीसाठी जसा दिलासा मिळाला, तशीच संधी गुंतवणूकीसाठी निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे संधी म्हणून बघायला हवे. पुढच्या वर्षात सोने-चांदी दर पुन्हा वधारण्याचा अंदाज आहे.
- गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन
सामान्य कुटुंबांच्या संपत्तीवर परिणाम
या घसरणीचा परिणाम केवळ मोठ्या गुंतवणूकदारांपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रात सोने हे पारंपरिक बचतीचे महत्त्वाचे साधन आहे. लग्नकार्य, सण-समारंभ तसेच भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी अनेक कुटुंबे सोन्याचे दागिने खरेदी करतात. मात्र, उच्च दराने सोने खरेदी केलेल्या कुटुंबांच्या दागिन्यांचे सध्याचे बाजारमूल्य घटले आहे. गरजेच्या वेळी सोने विकण्याची वेळ आल्यास अपेक्षित रक्कम मिळण्यातही फरक पडू शकतो.