नाशिक : चार दिवसांपूर्वी ९० हजारांच्या खाली उतरलेल्या सोनेदराने, मोठी झेप घेत चक्क ९६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एक लाख दरापासून सोने आता फक्त चार पावले दूर असून, दरवाढीची गती बघता अवघ्या काही दिवसांतच सोने लाखाचा दर गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 'ट्रम्प टॅरिफ'मुळे सोनेदरात मोठ्या उलाढाली होत असून, शुक्रवारी (दि.११) दरांनी नवा उच्चांक नोंदविल्याने, गुंतवणूकदार सक्रिय झाल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
सोने-चांदी दर (जीएसटीसह)
२४ कॅरेट, प्रतितोळा - ९६ हजार ५०० रु.
२२ कॅरेट, प्रतितोळा - ८८ हजार ८०० रु.
चांदी - प्रतिकिलो - ९७ हजार ३०० रु.
सोनेदरात सातत्याने वाढ होत असताना, गेल्या ८ मार्च रोजी सोने अचानक ९० हजारांच्या खाली आल्याने, बाजारात एकच खळबळ उडाली होती. त्यातच अमेरिकेच्या एका वित्तीय संस्थेने दर ३८ टक्क्यांनी घसरून ५५ हजारांपर्यंत येणार असल्याचे भाकीत वर्तविल्याने, ग्राहकांमध्ये चलबिचल बघावयास मिळाली. अनेकांनी सोने मोडण्यासाठी बाजारात गर्दी केली. यातून काही व्यावसायिकांनी नफेखोरीही साधली. सराफ बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होत असतानाच, ट्रम्प सरकारने ७५ देशांना टॅरिफमधून ९० दिवसांची सूट दिल्याने, पुन्हा एकदा सोने दरवाढ हाेण्यास सुरुवात झाली आहे. अवघ्या चारच दिवसांत सोने तब्बल साडेसहा हजारांनी वधारल्याने, गुंतवणूकदारांना सुखद धक्का तर यंदा कर्तव्य असलेल्या यजमान मंडळींना मोठा धक्का बसला आहे.
यंदाच्या दसरा-दिवाळीत सोनेदर लाखाचा टप्पा गाठेल, असा अंदाज प्रारंभी वर्तविला जात होता. मात्र, आताची गती बघता पुढील काही दिवसांतच सोनेदर लाखाच्या पार जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढत्या दरवाढीमुळे सोने खरेदी सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे.
यापूर्वीच चांदीने एक लाखाचा टप्पा पार केला असून, पुन्हा एकदा चांदी लाखाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. महिन्याच्या प्रारंभी २ एप्रिल रोजी चांदी दराने प्रतिकिलो एक लाख पाच हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र, तीन दिवसांपूर्वी चांदी ९३ हजारांवर आली होती. आता पुन्हा एकदा चांदी दरवाढ नोंदविली जात आहे. शुक्रवारी चांदीचे दर ९७ हजार ३०० रुपये प्रतिकिलो इतके नोंदविले गेले.