इराण- इस्त्रायल संघर्षात 'सोने' भडकले Pudhari News Network
नाशिक

Gold Rate Hike | इराण- इस्त्रायल संघर्षात 'सोने' भडकले

15 दिवसात चार हजारांची वाढ : चांदीला तब्बल नऊ हजारांची चकाकी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : इराण- इस्त्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावरील स्थिती चिंताजनक बनली असून, दोन्ही देशांमधील सततच्या क्षेपणास्त्र हल्यांचा परिणाम जागतिक बाजारपेठेतील मौल्यवान धातूच्या किंमतींवर होत आहे.

मागील १५ दिवसात सोने दर चार हजारांपेक्षा अधिक भडकले असून, चांदीला नऊ हजारांपेक्षा अधिकची चकाकी मिळाली आहे. अगोदरच सततच्या दरवाढीमुळे सोने-चांदी खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असताना, युद्धामुळे होत असलेली दरातील वाढ चिंता वाढविणारी ठरत आहे

असे वाढले दर

३० मे २०२५ रोजीचे दर

  • २४ कॅरेट - प्रति तोळा - ९८,७८० रु.

  • २२ कॅरेट - प्रति तोळा - ९०,८८० रु.

  • चांदी - प्रति किलो - १,०१, ४५० रु.

१५ जून २०२५ रोजीचे दर

  • २४ कॅरेट - प्रति तोळा - १,०२,९५० रु.

  • २२ कॅरेट - प्रति तोळा - ९४,७१० रु.

  • चांदी - प्रति किलो - १,१०,७२५ रु.

  • (दर जीएसटीसह)

गेल्या २२ एप्रिल रोजी सोने दरांनी देशात लाखाचा टप्पा पार केल्यानंतर, दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने दर काय असेल या कल्पनेनीच मध्यमवर्गीयांच्या काळजात धस्स होत होती. मात्र, मे आणि जूनमध्ये सोने दरातील सततच्या चढउतारानंतर दर पुन्हा लाखाच्या आत आल्याने, सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली होती. तर मागील १५ दिवसात इराण-इस्त्रायलमधील तीव्र संघर्षमाुळे पुन्हा एकदा चढउतारानंतर सोने दरांनी लाखाचा टप्पा पार केला आहे. गेल्या ३० मे रोजी २४ कॅरेट सोने दर, प्रति तोळा, जीएसटीसहू ९८ हजार ७८० रुपये इतका होता. तर हाच दर रविवारी (दि.१५) जीएसटीसह एक लाख, दोन हजार, ९५० रुपयांवर पोहोचला आहे. अवघ्या १५ दिवसात दरात तब्बल चार हजार १७० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोने दरातही तीन हजार ८३० रुपयांची वाढ झाली आहे. वास्तविक, गेल्या ७,८,९ व १० जून रोजी सोने दरात सतत पडझड झाली. २४ कॅरेट सोने दर ९७ हजारांवर आले होते. मात्र, इस्त्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला इराणने जशास तसे उत्तर दिल्याने, त्याचा थेट परिणाम मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर झाला.

गेल्या तीन दिवसात सलग दरवाढ नोंदविली गेल्याने तीनच दिवसात साडेतीन हजारांची घसघशीत वाढ नोंदविली गेली. तर इराण-इस्त्रायलमधील वाढता संघर्ष बघता, या आठवड्यात देखील सोने दर उच्चांकी नोंद करण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

इराण-इस्त्रायलमधील वाढता संघर्ष सोने-चांदी दरांवर परिणाम करणारा ठरत आहे. वाढते दर मध्यमवर्गीय ग्राहकांची चिंता वाढविणारे असले तरी, गुंतवणूकदारांसाठी संधी ठरत आहे. पुढील काळात सोने-चांदी दर आणखी भडकण्याची शक्यता असल्याने, सोने-चांदीत गुंतवणूकीची संधी आहे.
गिरीष नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन.

चांदी दर सुसाट

गेल्या ३० मे रोजी चांदी दर प्रति किलोसाठी जीएसटीसह एक लाख, एक हजार, ४५० रुपये इतका होता. तर रविवारी (दि.१५) चांदी एक लाख, १० हजार, ७२५ रुपयांवर पोहोचली. अवघ्या १५ दिवसात चांदीच्या दरात नऊ हजार २७५ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीतील दरवाढ मोठी असून, आतापर्यंतची उच्चांकी दरवाढ असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT