जागतिक घडामोडींमुळे साने दरात मोठी उलथापालथ Pudhari News Network
नाशिक

Gold Rate | सोने तीन महिन्यात 17 हजारांनी महाग; तीन दिवसात 2700 रुपयांनी स्वस्त

दरवाढीचा वेग 20 टक्क्यांवर : जागतिक घडामोडींमुळे दरात मोठी उलथापालथ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतिश डोंगरे

गेल्या काही महिन्यात सोने दरवाढीतील वेग थक्क करणारा असून, सोने दर दिवसागणिक दरवाढीचा उच्चांक नोंदवित आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या तीनच महिन्याच्या काळात सोन्याच्या किंमतीत तब्बल १७ हजारांपेक्षा अधिक वाढ झाली असून, दरवाढीचा वेग विक्रमी २० टक्के इतका नोंदविला आहे. जागतिक घडामोडींचा साेने दरवाढीवर परिणाम होत असला तरी, जागतिक घडामोडींमुळेच मागील तीन दिवसात सोने २७०० रुपयांनी वधारल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

वर्षे - सोन्याचे दर

  • डिसेंबर २०२१ - ४८ हजार ८८० रु.

  • डिसेंबर २०२२ - ५४ हजार ३८० रु.

  • डिसेंबर २०२३ - ६३ हजार १८७

  • डिसेंबर २०२४ - ७६ हजार ८५०

  • ३ एप्रिल २०२५ - ९३ हजार ४१०

मागील काही महिन्यात ज्या गतीने सोन्याचे दर वाढत आहेत, त्यावरून लवकरच सोने एक लाखांचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. सोन्याने विक्रमी प्रति तोळा ९४ हजारांचा आकडा गाठला आहे. हा आकडा गाठताना मागील तीन महिन्याचा कालावधी महत्त्वपूर्ण ठरला आहे. जानेवारी २०२५ मध्ये २४ कॅरेट सोने, प्रति तोळा, ७६ हजार १६२ रुपयांवर होते. तर ३ एप्रिल २०२५ रोजी २४ कॅरेट सोने, प्रति तोळा ९३ हजार ४१० रुपयांवर होते. अवघ्या तीनच महिन्यात सोने दरात तब्बल १७ हजार २४८ रुपयांची घसघशीत वाढ नोंदविली गेली आहे. सोने दरवाढीचा वेग विक्रमी २० टक्क्यांवर असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी त्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मागील पाच वर्षांचा विचार केल्यास २०२१ ते २०२३ या तीन वर्षाच्या काळात सोन्यातील सरासरी वार्षिक वाढ सात ते आठ हजार इतकी होती. २०२४ पासून मात्र, सोने दराचा वेग झपाट्याने वाढला. डिसेंबर २०२३ मध्ये २४ कॅरेट सोने, प्रति तोळा ६३ हजार १८७ रुपयांवर होते. तर डिसेंबर २०२४ मध्ये २४ कॅरेट सोने, प्रति तोळा ७६ हजार ८५० रुपयांवर पोहोचले. वर्षभरात सोन्याच्या किंमतीत १३ हजार ६६३ रुपयांची वाढ झाली. तर २०२५ मध्ये अवघ्या तीनच महिन्यात विक्रमी १७ हजारांपेक्षा अधिक वाढ नोंदविली गेली.

मागील तीन दिवसात सोन्याच्या किंमती २,७२० रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. सद्यस्थितीत सोने ९० हजार ६९० रुपयांवर स्थिरावले असले तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा वेग बघता दर कमी होणार की वाढणार? ही धाकधुक कायम आहे.

सोने दर 55 हजारांवर येणार?

अमेरिकेतील एका वित्तीय संस्थेनुसार पुढील काळात सोन्याच्या किंमती ३८ टक्क्यांनी घटून दर ५५ हजारांपर्यंत खाली येणार आहेत. गेल्या तीन दिवसात घटलेले सोने दर हे त्याचेच द्योतक असल्याचेही बोलले जात आहे. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे सोन्यात गुंतवणूकीचे प्रमाण वाढले असून, दर घसरल्यास गुंतवणूकदारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

चांदीतही मोठी घसरण

एक लाख पाच हजार प्रति किलोंवर पोहोचलेल्या चांदीतही मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. चांदी अवघ्या काही दिवसात ११ हजारांनी खाली आली आहे. सध्या चांदी प्रति किलो ९४ हजारांवर आहे. पुढील काळात चांदीत आणखी घसरण होण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT