नाशिक : जागतिक स्तरावरील घडामोडी, विशेषत: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सोने दर सर्वकालिन उच्चांकावर पोहोचला आहे. मागील दहाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल चार हजारांची वाढ झाली असून, सध्या २४ कॅरेट सोने प्रति तोळा ८७ हजारांच्या पार गेले आहे. तर चांदीलाही चकाकी मिळाली असून, पुन्हा एकदा लाखाच्या उबरठ्यावर पोहोचली आहे.
सोने दरात सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता, केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्क १५ टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर आणले होते. त्यावेळी सोन्याचे दर अवघ्या १५ दिवसात सहा हजारांनी कमी झाले होते. सरकारच्या या निर्णयानंतर सोने-चांदीचे दर आवाक्यात राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दिवाळीत सोने ८० हजारांच्या पार, तर चांदीने लाखाचा टप्पा गाठल्याचे दिसून आले. आता तर सोन्याने सर्वकालिन उच्चांक गाठत ८७ हजारांचा आकडा पार केल्याने, सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सोन्याचे दर जागतिक स्तरावरील घडामोडींवर अवलंबून असतात. प्रारंभी रशिया-युक्रेन तसेच इस्त्राइल, हमास युद्धाचा सोने दरावर परिणाम झाला. हा परिणाम कायम असतानाच अमेरिकेचे नुतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह कॅनडा, मेक्सिको या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर तब्बल २५ टक्के शुल्क वाढविण्याचा निर्णय जाहीर केल्याने, त्याचा थेट परिणाम सोने दरांवर झाल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.
मागील दहाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार ८३० रुपयांची वाढ झाली आहे. २७ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोने प्रति तोळ्याचा दर ८२ हजार ४४० रुपये इतका होता. तर बुधवारी (दि.५) हा दर ८७ हजार ४५० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीतही मोठी दरवाढ झाली असून, चांदीचा दर प्रति किलो ९९ हजार तीनशे रुपये इतका नोंदविला गेला आहे.
२४ कॅरेट - प्रति तोळा - ८७ हजार ४५०
२२ कॅरेट - प्रति तोळा - ८० हजार ४५०
चांदी - प्रति किलो - ९९ हजार ३००
जागतिक स्तरावरील घडामोडींचा सोने-चांदीच्या दरावर सातत्याने परिणाम होत आहे. पुढील काळातही सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता असल्याने, गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. सध्या सोन्यात गुंतवणूकीचा पर्याय पुढे येत असल्याने, दरवाढीतही खरेदी जोरात आहे.- गिरीष नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन