Gold price rises again
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. Pudhari File Photo
नाशिक

Gold Rate | सोने दरात दहा दिवसांत एक हजाराची वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सोने दरातील तेजी कायम असून, दरात मागील 10 दिवसांत तब्बल एक हजार ६४ रुपयांची वाढीव भर पडल्याने, दर प्रति 10 ग्रॅमसाठी ७३ हजार ८३ रुपयांवर पोहोचले आहेत. दुसरीकडे चांदीलाही मोठी चकाकी मिळाली असून, चांदीने ९४ हजारांचा आकडा पार केला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या दरात झालेली वाढ गेल्या दीड महिन्यातील उच्चांकी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने-चांदी दरातील तेजी कायम असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरवाढीस अनुकूल वातावरण असल्याने, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर दिसून येत आहे. अमेरिकेच्या सेंट्रल बँक, फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता असल्याने, पुढच्या काळात सोने-चांदीचा दर 'ऑल टाइम हाय' ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील 10 दिवसांत सोने दरात एक हजाराहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या २८ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ७२ हजार १९ रुपये इतका नोंदविला गेला होता. पुढे १ जुलैचा अपवाद वगळता दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, रविवारपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ७३ हजार ८३ रुपये इतका नोंदविला गेला. म्हणजेच अवघ्या 10 दिवसांत सोन्याच्या दरात एक हजार ६४ रुपयांची वाढ नोंदविली गेली. तर गेल्या २८ जून रोजी २२ कॅरेट सोने दर ६६ हजार १८ रुपये इतका होता. ७ जून रोजी ६७ हजार ६८ रुपये इतका सोने दर नोंदविला गेला. २२ कॅरेट सोने दरातदेखील अवघ्या 10 दिवसांत एक हजार ५० रुपयांची वाढ नोंदविली गेली.

गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने तेजी नोंदविली जात आहे. अर्थात यास आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्या, तरी आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने-चांदीत गुंतवणुकीची मोठी संधी असून, नागरिकांनी सोने-चांदी खरेदीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सराफांकडून केले जात आहे.

चांदी ओलांडणार लाखाचा टप्पा

सोन्याबरोबरच चांदीच्या दरात तेजीने वाढ होत आहे. अवघ्या 10 दिवसांत चांदीच्या दरात तब्बल चार हजार ८०० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. गेल्या २८ जून रोजी चांदीचा दर प्रतिकिलो ९० हजार होता. ७ जुलैपर्यंत तो ९४ हजार ८०० रुपयांवर पोहोचला. ज्या गतीने चांदीच्या दरात वाढ नोंदविली जात आहे, त्यावरून चांदी लवकरच एक लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. चांदीतील तेजी अशीच राहिल्यास या महिनाअखेरपर्यंत चांदी एक लाखाचा टप्पा पार करेल अशी शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

SCROLL FOR NEXT