नाशिक : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सलग घसरण नोंदविणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरांनी आता पुन्हा उसळी घेतली. नाशिकच्या सराफ बाजारात सोमवारी (दि. २३) सोन्याच्या दरात प्रतितोळा तीन हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो दोन हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे घसरणीच्या मालिकेनंतर सराफ बाजारात दरवाढीचे चित्र निर्माण झाले आहे.
नाशिकमध्ये रविवारी सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख २३ हजार रुपये होता. त्यात सोमवारी तीन हजार रुपयांची वाढ होऊन तो एक लाख २६ हजार रुपयांवर पोहोचला. चांदीचा दरही रविवारी प्रतिकिलो एक लाख ५५ हजार रुपये होता. सोमवारी त्यात दोन हजारांची वाढ होऊन चांदी एक लाख ५७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक बाजारातील चढ-उतारांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, अचानक झालेल्या दरवाढीने खरेदीदार पुन्हा संभ्रमात पडले असले तरी आता सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता नसल्याचे सराफ व्यावसायिक मयूर शहाणे यांनी सांगितले.