नाशिक : शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम थेट सोने, चांदीच्या किंमतीवर झाला असून, सोने दोन तर चांदी तीन हजारांनी महागली आहे. सध्या लगीनसराईची रंगत वाढली असतानाच, सोने-चांदीच्या दरवाढीमुळे यजमान मंडळींच्या चिंतेत भर पडली आहे. जळगावात मंगळवारी (दि.२५) २४ कॅरेट सोन्याने प्रति तोळा जीएसटीसह १ लाख २९ हजार ५९ रुपये इतका दर नोंदविला. तर चांदी प्रति किलो जीएसटीसह १ लाख ६३ हजारांवर पोहोचली आहे.
असे आहेत दर...
२४ कॅरेट-प्रति तोळा - १ लाख २९ हजार ५९ रुपये.
२२ कॅरेट - प्रति तोळा - १ लाख १८ हजार २१३ रुपये.
चांदी - प्रति किलो - १ लाख ६३ हजार रुपये.
(सर्व दर जीएसटीसह)
मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार बघावयास मिळत आहे. गत आठवड्यात सोने अडीच हजारांनी तर चांदी साडे तीन हजारांनी स्वस्त झाली होती. त्यामुळे 'यंदा कर्तव्य' असलेल्या यजमान मंडळींना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, चालु आठवड्याच्या प्रारंभीच शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण तयार झाल्याने, सोने-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. जाणकारांच्या मते, पुढील काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. जागतिक स्तरावर देखील अस्थिरतेच्या अनेक घडामोडी घडत असल्याने, त्याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या किंमती वाढण्यावर होण्याची शक्यता आहे.
जेव्हा सोने ७० हजारांवर होते, तेव्हा त्यात ५०० ते ७०० रुपयांची वाढ सर्वसामान्य होती. आता सोने सव्वा लाख पार आहे. त्यात दीड, दोन हजारांची वाढ स्वाभाविक असून, पुढच्या काळात देखील बाजारात दरातील चढउताराचे प्रकार सुरूच राहणार आहेत. शेअर बाजारातील परिस्थिती बघता, दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.गिरीश नवले, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.