नाशिक : जागतिक स्तरावर घडत असलेल्या घडामोडींचा सोने-चांदी दरांवर मोठा परिणाम होत असून, दरातील तेजी ग्राहकांना धक्का देणारी ठरत आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर उच्चांकी दर नोंदविणाऱ्या सोन्यात आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच मोठी तेजी दिसून आली. साेने ९४ हजारांच्या उंबरठ्यावर असून, चांदीही उच्चांकावर आहे.
२४ कॅरेट - प्रतितोळा - ९३ हजार ८००
२२ कॅरेट - प्रतितोळा - ८६ हजार ३००
चांदी - प्रतिकिलो - एक लाख चार हजार
पुढील महिन्यात लग्नसराईच्या बऱ्याच तारखा असून, यजमान मंडळींकडून सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, वाढते दर यजमानांना धक्का देणारे ठरत आहेत. मंगळवारी दराने पुन्हा एकदा उच्चांकी आकडा गाठला आहे. मंगळवारी सोने दर २४ कॅरेट, प्रतितोळा ९३ हजार ८०० रुपयांवर पोहोचला होता. तर २२ कॅरेट प्रतितोळा ८६ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी तेजी दिसून येत आहे. चांदी एक लाख चार हजारांवर पोहोचली असून, गुंतवणूकदारांना वाढते दर आकर्षित करीत आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, व्यापारीवर्ग देखील धास्तावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गुंतवणूकदार मात्र याकडे संधी म्हणून बघत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.