Gokul Jirwal, Narahari Jirwal
गोकुळ झिरवाळ पिता नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात निवडणूक लढायला तयार  File photo
नाशिक

Gokul Jirwal | दिंडोरीत पिता-पुत्र आमने-सामने? गोकुळ झिरवाळ वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आयोजित केलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ यांनी हजेरी लावली. पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास दिंडोरीतून पिता नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी घोषित केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत गोकुळ झिरवाळांनी घेतलेल्या भुमिकेमुळे विविध चर्चांना ऊधाण आले आहे.

लोकसभा निवडणूकीत शरद पवार पक्षाने घवघवीत यश संपादित केले. या यशानंतर अजित पवार गटातील विद्यमान आमदारांना घरवापसीचे वेध लागले आहे. त्यामध्ये दिंडोरीचे नरहरी झिरवाळ यांचेही नाव आघाडीवर आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात होते. त्यानंतर झिरवाळ यांच्या वाढदिवसाच्या दिंडोरीत झळकलेल्या बॅनर्सवरही ज्येष्ठ नेते पवार आणि श्रीराम शेटे यांचे छायाचित्र पाहायला मिळाले. त्यामूळे झिरवाळ स्वगृही परतणार अशी चर्चा सर्वत्र असताना गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटाच्या निष्ठावान कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावली.

गोकुळ झिरवाळ यांच्याशी संवाद साधला असता मी आघाडी व शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील. मुळातच माझ्या राजकारणाची सुरवातच पवार साहेबांना पाहत-पाहत झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतो आहे. दिंडाेरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासही मी इच्छुक होतो, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले. तसेच राजकारण वेगळे आणि कुटुंब वेगळे असल्याचे स्पष्ट करताना विधानसभेसाठी दिंडोरीतून लढण्यास आपण इच्छूक आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास वडील नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात निवडणूक लढू अशी भुमिका गोकुळ यांनी जाहिर केली. त्यामुळे निवडणूकीत नरहरी झिरवाळ यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT