नाशिक : शंखनाद सोहळ्यात भाविकांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत मान्यवर. (छाया : हेमंत घोरपडे) 
नाशिक

Nashik- गोदातीरी विश्वविक्रमी शंखनाद, गिनीज बुकमध्ये नोंद

अमेरिकेला मागे टाकत ५१७ वादकांनी नोंदविला इतिहास

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर नाशिकच्या गोदातीरी ५१७ शंखांचा एकाच वेळी निनाद घुमला. सामूहिक शंखवादनातील अमेरिकेच्या नावावर असलेला ३०३ जणांचा विक्रम मागे टाकत नाशिकने रविवारी (दि.२५) ६ वाजून ५ मिनिटे आणि ३५ व्या सेकंदाला या विश्वविक्रमाची नोंद केली. या शंखनादाचे परीक्षण प्रक्रिया पूर्ण होऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी तुम्ही एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे, अशी घोषणा करताच गोदावरीचा पवित्र तीर 'भारत माता की जय' 'हर हर महादेव', 'जय श्रीराम'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. या ऐतिहासिक क्षणाने गोदातीरावर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचालित अनंतविजय शंखनाद पथकाच्या पुढाकाराने देवमामलेदार पटांगणावर हा उपक्रम झाला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार सहभागी शंखवादकांची पडताळणी करण्यात आली. सायंकाळी पावणेसहाला ५१७शंखांचा एकसुरात निनाद झाला. यापूर्वी अमेरिकेत ३०३ जणांनी एकाच वेळी शंखनाद केल्याची नोंद होती. हा विक्रम आता भारताच्या नावावर झाला असून, सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने अनंतविजय शंखनाद समूहाने हा विक्रम मोडीत काढला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, उपमहापौर विलास शिंदे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महंत गोपालदास, महंत रामकृष्ण महाराज, महंत मंगलपुरी महाराज उपस्थित होते.

विश्वविक्रमाची नोंद होताच शंखवादक भावुक

अनंतविजय शंखवादक समूहाच्या ५१७ वादकांनी अमेरिकेचा विक्रम मोडीत काढला. या विश्वविक्रमाची नोंद होताच शंखवादकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. अनेकांनी एकमेकांना आलिंगन देऊन आनंद साजरा केला.

शंख निनादात 'जय श्रीराम'

शंखनादाचा विक्रम होताच 'जय श्रीराम', 'भारत माता की जय' आणि 'गणपती बाप्पा मोरया' या घोषणांनी परिसर दुमदुमला. शंखवादनातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत 'शिवगर्जना' देण्यात आली.

ध्वजारोहणालाही होणार शंखनाद

रामकुंड आणि कुशावर्ततीर्थ येथे ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या महाकुंभमेळा ध्वजारोहणावेळी याच समूहातील २५१ शंखवादकांकडून ध्वजारोहणाच्या नेमक्या क्षणी सामूहिक शंखनाद होणार आहे.

पोलिसांचा बंदोबस्त, ध्वजारोहणाची तालीम

शंखवादनाच्या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो नाशिककर गोदातीरी जमले. पोलिसांनी येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन करत हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडल्याने या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याची रंगीत तालिम यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT