नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गटारीचे चोकअप काढण्याच्या नावाखाली तब्बल तीन महिने गोदावरी नदीपात्रात सांडपाणी सोडणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी याचिकाकर्ते तथा पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी विभागीय महसूल आयुक्त तथा उच्च न्यायालयाने नेमलेल्या गोदावरी नदी प्रदूषणमुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात पगारे यांनी डॉ. गेडाम यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, टाकळी गावाजवळ गटार चोकअप झाल्याने चेंबर फोडून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात आले होते.
तब्बल तीन महिने हे सांडपाणी गटारीत मिसळत होते. पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतल्यानंतर चेंबरची दुरुस्ती करण्यात आली. यासंदर्भात महापालिकेचे मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी चोकअप झाल्यामुळे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याचे तसेच चेंबरची दुरुस्ती केल्याची लेखी पत्राद्वारे कबुली दिली.
दिवाळी व छटपूजा काळातही लेंडीनाल्यातून थेट रामकुंडात सांडपाणी येत असल्याची तकार केल्यानंतर कार्यकारी अभियंता गणेश मैद यांनी रामवाडी नाल्याचे सांडपाणी गोदावरी नदीत वाहणार नाही, याकरिता चोकअप काढण्याचे काम पूर्ण करून सांडपाणी प्रवाह बंद केल्याची पत्राद्वारे कबुली दिली आहे.
गोदावरी नदीपात्रात सांडपाणी सोडले जाणार नाही, याची संपूर्णपणे जबाबदारी मनपाची आहे. तरी देखील नदी प्रदूषित करणे, नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणे, नदीपात्रात जाणीवपूर्वक सांडपाण्याच्या गटार, विषारी कचरा किवा रसायने टाकण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे नदीचे पाणी वापरण्याजोगे रहात नाही. नैसर्गिक जलस्त्रोतांशी छेडछाड करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचे आदेश व निरी या संस्थेच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या नाशिक महापालिकेच्या सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पगार यांनी केली आहे
गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात जोपर्यंत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत गोदावरी नदी प्रदूषणमुक्तच होणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे.- निशिकांत पगारे, सदस्य, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त समिती