Godavari River 
नाशिक

Godavari River Pollution | गोदावरी नदीतील ऑक्सिजनचे प्रमाण झाले 'शून्य'; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामुळे मोठा खळबळ

Godavari River Pollution | नदी जैविकदृष्ट्या 'मृत' झाल्याचा प्रदूषण मंडळाचा अहवाल : कुंभमेळ्याच्या तोंडावर धक्कादायक वास्तव

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यापासून कुंभमेळ्याचा आरंभ मानला जात असताना गोदावरी नदी जैविकदृष्ट्या पूर्णपणे 'मृत' झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरीच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून दिलेल्या अधिकृत प्रयोगशाला अहवालात पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनची पातळी अक्षरशः 'शून्य' नोंदवली गेले आहे.

नदीचे पात्र प्रक्रिया न केलेले सांडपाणी, मानवी विष्टा आणि औद्योगिक रसायने वाहून नेणारे गटार बनल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय प्रयोगशालाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी गोदावरी पात्रातील विविध ठिकाणांहून घेतलेल्या पाण्याचे नमुने तपासले.

त्याचा अहवाल १९ ऑक्टोबर रोजी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार, तपवानातील गोदावरी-कपिला संगम, दतक परिसर आणि टाकळी या तिन्ही मुख्य ठिकाणी विरघळलेला प्राणवायू पूर्णपणे शून्य आढळला आहे.

घातक रसायनाने आणि मलजलाचा पूर

पाण्यात औद्योगिक रसायनांचे प्रमाण दर्शवणारी केमिकल ऑक्सिजन डिमांड तपोवन संगमावर तब्बल १९६ मिलिग्राम प्रतिलिटर आणि दसक परिसरात १४० मिलिग्राम प्रतिलिटर इतकी घातक आढळली आहे.

याहून अधिक गंभीर बाब म्हणजे, पाण्यात मलजलाचे प्रमाण दर्शवणारे फिकल कॉलिफॉर्म तपोवन येथे ७० एमपीएन/१०० एमएल, तर संपूर्ण कॉलिफॉर्म २८० एमपीएन/१०० एमएल इतके भयानक नोंदवले गेले आहे. प्रक्रिया न केलेले मलजल थेट पात्रात मिसळत असल्याने पाण्यात ई-कोलायसारख्या घातक जिवाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.

तपोवन संगमावर प्रदूषणाचे तांडव; 'बीओडी' मर्यादापेक्षा २८ पटीने अधिक

अहवालानुसार, तपोवनातील गोदावरी व कपिला नदीच्या संगमावर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड तब्बल ८४.० मिलिग्राम प्रतिलिटरइतकी नोंदवली गेली आहे. नदीच्या पाण्यासाठी सुरक्षित मानली जाणारी मर्यादा ३ मिलिग्राम प्रतिलिटरपेक्षा कमी असताना,

ही पातळी सुरक्षित मानंकापेक्षा २८ पटीने जास्त आढळली आहे. याशिवाय दसक परिसरात 'बीओडी' ५२.० मिलिग्राम प्रतिलिटर, तर टाकळी परिसरात १७.० मिलिग्राम प्रतिलिटरइतकी घातक नोंद झाली आहे.

त्वचारोग व साथीच्या रोगांचा धोका

कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक गोदावरीच्या पात्रात पवित्र स्नान व आचमन करण्यासाठी येतात. मात्र, सध्याच्या स्थितीतील पाणी स्नानासाठीही अत्यंत घातक बनले आहे. अशा दूषित पाण्यात उतरल्यास त्वचारोग, टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो आणि यकृताचे गंभीर संसर्गजन्य आजार उद्भवण्याचा तीव्र धोका निर्माण झाला आहे.

नदी संवर्धन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नाशिक महापालिका आणि संबंधित यंत्रणा गोदावरीत जाणारे सांडपाणी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. या गंभीर परिस्थितीबद्दल पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या गोदावरी नदी प्रदूषण याचिकेवर येत्या ३ नोव्हेंबर २०२६ रोजी तातडीची सुनावणी होणार असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा संपूर्ण अधिकृत अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे.
— राजेश पंडित, याचिकाकर्ते
प्राणवायू शून्य होणे हा नदीच्या संपूर्ण जैविक मृत्यूचा पुरावा असून, यात मासे किंवा कोणताही जलचर जिवंत राहणे अशक्य आहे.
— प्रवीण शिलावट, पर्यावरणप्रेमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT