नाशिक : गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर असताना, स्वच्छतेच्या नुसत्याच गप्पा मारणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिच्चून नागरिकांनी गोदावरीच्या किनारी वाहने धुण्यासाठी रांगाच्या रांगा लावल्या होत्या. त्यामुळे हा नक्की गोदेचा किनारा की वॉशिंग सेंटर असा प्रश्न पडला.
दसऱ्याच्या दिवशी वाहने धुवून त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे बरेच नागरिक वॉशिंग सेंटर किंवा घरीच वाहने धुतात. मात्र, काही बहाद्दरांनी थेट गोदावरीच्या किनारीच वाहने लावून धुतली. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, ट्रक अशा सर्वच प्रकारची वाहने धुण्यासाठी गोदेच्या किनारी रांग लागली होती. सकाळपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत वाहने धुण्याचा प्रकार सुरू होता. मात्र, याकडे कोणीही लक्ष दिले नाही.
एकीकडे गोदावरी प्रदूषणाबाबत नुसत्याच गप्पा मारणाऱ्या प्रशासनाला तर याबाबत थांगपत्ताही नव्हता. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. प्रशासनाकडून देखील गोदावरी स्वच्छतेसाठी कागद रंगविले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र, गोदा स्वच्छतेसाठी 'ग्राऊंड'वर कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत.
गोदेच्या किनाऱ्या दसऱ्याच्या दिवशीच नव्हे तर नेहमीच वाहने धुण्याचा कार्यक्रम सुरू असतो. मात्र, प्रशासनाकडून कधीही या मंडळींना हटकले जात नाही. केवळ पानवेलीवरून गळा आवळणाऱ्या कथित पर्यावरणवादी मंडळी देखील या वाहन धुणाऱ्यांबाबत डोळे झाकून असतात. वाहने धुतल्यामुळे घातक आईल गोदेच्या पात्रात मिसळते. यामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात येत आहे. अगोदरच प्रदूषणाचे टोक गाठलेल्या गोदावरीत वाहने धुणारे भरच घालत आहेत. त्यामुळे या मंडळींना राेखले जाणार काय? असा प्रश्न आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.