Nashik Godavari Flood  
नाशिक

Nashik Godavari Flood | "दुतोंड्या' मारुतीला जलाभिषेक! गोदावरी धोक्याच्या पातळीवर, गंगापूर धरणातून 14 हजार क्युसेकने विसर्ग"

Nashik Godavari Flood | गोदावरी धोक्याच्या पातळीवर : गंगापूर धरणातून १४ हजार क्युसेकने विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २३) सर्वदूर बरसलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील गोदावरी व दारणा या दोन प्रमुख नद्या दुथडी वाहत आहेत. गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी मोजण्याचे पारंपरिक मानक मानले जाणाऱ्या रामतीर्थ परिसरातील दुतोंड्या मारुतीला जलाभिषेक झाल्याने, गोदावरी धोक्याची पातळी ओलांडत वाहत आहे.

गंगापूर धरणातून १४ हजारांपेक्षा अधिक क्युसेकने, तर होळकर पुलावरून १७ हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात मागील २४ तासांत विक्रमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणं आणि जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

१० धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, गोदावरीसह दारणा नदीकाठोकाठ वाहत आहे. बुधवारी (दि. २२) रात्रभरापासूनच मुसळधार पाऊस कोसळल्याने, पहाटेपासूनच गंगापूर धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली गेली. गुरुवारी सकाळी ६ वाजता ४९० क्युसेकने विसर्ग केला गेला.

टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करीत सकाळी १०.३० वाजेपर्यंत ५ हजार २९५ क्युसेकने विसर्ग सुरू केला. सायं. ४.३० च्या सुमारास विसर्गात १२ हजार ६०० क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. तर सायंकाळी ६ वाजता १३ हजार ९९२ क्युसेकने विसर्ग करण्यात आला.

त्यामुळे गोदावरीला मोठा पूर आला असून, हंगामात पहिल्यांदाच दुतोंड्या मारुती बुडाला आहे. होळकर पुलावरून १७ हजारांपेक्षा अधिक क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देताना, अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाचा जोर लक्षात घेता, विसर्गात आणखी वाढ केली जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज ऑरेंज अलर्ट

नाशिकमध्ये धुवाधार पाऊस बरसत असून, शुक्रवारी (दि. २४) नाशिक घाटमाथा परिसराला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर नाशिकला यलो अलर्ट दिला आहे. गुरुवारी (दि. २३) नाशिक घाटमाथा परिसराला रेड अलर्ट देण्यात आला होता. पुढील २४ तासांत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होण्याची अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT