महावितरणचा अभियंता यग्नेश पवार हा गाेदावरीला पूर आल्याने पात्रातील पाण्यात वाहून गेला. pudhari news network
नाशिक

Godavari Flood News | आईसमोर मुलगा गोदापात्रात बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कालसर्प याेगाची पूजा करण्यासाठी पंचवटीत आलेला महावितरणचा अभियंता गाेदापात्रातील पाण्यात वाहून गेल्याची रविवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास डोळ्यांदेखत मुलगा वाहून गेल्याने आईने हंबरडा फोडला. दरम्यान, एक चिमुकलीही पाण्यात पडली. मात्र, स्थानिक जीवरक्षकांनी तिचा जीव वाचविला. यग्नेश पवार (२९, रा. ओझर) असे अभियंत्याचे नाव असून, ताे महावितरण कंपनीत अभियंता म्हणून भुसावळ येथे कार्यरत होता.

पाेलिसांच्या माहितीनुसार यग्नेश व त्याचे कुटुंब रविवारी (दि. ४) कालसर्प याेग व अन्य देवदर्शनासाठी पंचवटीत आले हाेते. रामकुंडालगत नीलकंठेश्वर मंदिराजवळील पाण्याजवळ पवार कुटुंब पूजा करत हाेते. नदीचे दर्शन घेण्यासाठी यग्नेश वाकला असता, त्याचा पाय घसरून ताे थेट पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. डोळ्यांदेखत मुलगा वाहत गेल्याचे पाहताच आईनेही मदतीसाठी टाहो फोडला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात यग्नेश दिसेनासा झाल्याने त्याला वाचवण्यात अडचणी आल्या. स्थानिक जीवरक्षक, अग्निशमन दल व पंचवटी पाेलिसांना माहिती कळविण्यात आली. त्यांनी नदीपात्रात त्याचा शाेध घेतला. मात्र, ताे आढळून आला नाही. या घटनेनंतर गोदाघाटासह नदीकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वाहून गेलेल्या युवकाच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास गोदापात्रात तीनवर्षीय चिमुकली पडली होती. सुदैवाने वेळीच ही घटना लक्षात आल्याने तिला पाण्याबाहेर काढण्यात आले.

सतर्कतेचा इशारा; आज सोमवार (दि.5) 'यलो अलर्ट'

गंगापूर धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ४ हजार क्यूसेकने विसर्ग साेडण्यात आला असून, संततधार अशीच राहिली तर, विसर्ग वेळाेवेळी वाढविला जाणार आहे. त्यामुळे, प्रशासनाकडून पंचवटीसह नदीकाठच्या रहिवाशी व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गोदाघाट परिसरातील दुकानेदेखील प्रशासनाकडून हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर, रामकुंड परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यासह पूर बघण्यासाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पंचवटी पाेलिसांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT