शेळी पालन pudhari news network
नाशिक

Stray Dogs Nashik | मोकाट श्वानांमुळे शेळी पालन संकटात

पुढारी वृत्तसेवा

मखमलाबाद : परिसरात सहारानगर, सांगळे मळे परिसरात महापालिकेने सोडलेल्या मोकाट श्वान हे शेळ्यांची शिकार करीत असल्याने शेतकऱ्यांचा शेळी पालन व्यवसाय धोक्यात आला आहे.

परिसरात गंधारवाडी, सुळेवाडी, काकड मळा आदी ठिकाणी बिबट्याने दहशत पसरवली असून, या परिसरातील शेतकऱ्यांचे श्वान फस्त केले. परंतु या परिसरात मनपाने सो़डलेले श्वान शेळी, बकरी आणि मेंढ्या यांची शिकार करत असल्याने येथील शेतकरी चिंतेत पडले आहेत. मखमलाबाद परिसरातील सहारानगर, सांगळे मळा व परिसरात मोकाट श्वानांनी शेळ्यांना लक्ष्य केले असून, शेळीपालक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

15 ते 20 मोकाट श्वान एकत्रित येऊन शेळ्यांवर हल्ला करतात. त्यांनी आतापर्यंत चार ते पाच शेळ्यांची शिकार केली आहे. रस्त्यावरून नागरिकांना पायी जाणे-येणे मुश्कील झाले आहे. ते दुचाकी व चारचाकी वाहनांचा पाठलाग करतात. दुचाकीमागे धावणाऱ्या मोकाट श्वानांमुळे अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर पडून जबर जखमी झाले आहेत.

परिसरात शेतकऱ्यांनी टोमॅटो, कोबी, फ्लाॅवर आदींसह इतर पिकांची लागवड केली असून, शेतीत काम करण्यासाठी शेतमजूर महिला श्वानांच्या धाकामुळे शेतीकामास येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे येथील शेतकरी अडचणी सापडले आहेत. मनपाने या परिसरात मोकाट श्वान सोडल्यामुळे येथील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरात कोणीही कुत्रे पाळलेले नसून अचानक 10 ते 15 कुत्रे अचानक या परिसरात येत असल्यामुळे महापालिकेने अशा ठिकाणी श्वान सोडू नये, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे. सहारानगर परिसरात नागरी वस्ती वाढली शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी जीव मुठीत धरून यावा लागतो.

मोकाट श्वानांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांना रस्त्यावरून जाणे-येणे मुश्कील झाले आहे. शेळीपालन करावे की नाही अशी चिंता आहे.
विनोद सांगळे, शेळीपालन व दुग्ध व्यावसायिक, मखमलाबाद, नाशिक.
मोकाट कुत्र्यामुळे तसेच बिबट्याच्या दहशतीमुळे येथील नागरिक, शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत.
संजय मानकर, मखमलाबाद, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT