पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात दुधापासून तयार होणाऱ्या पनीर आणि माव्याऐवजी मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या 'नॉन-डेअरी अनालॉग' उत्पादनांच्या गैरवापर आणि चुकीच्या लेबलिंगबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गंभीर इशारा दिला आहे. ग्राहकांना उत्पादन दुधापासून बनले आहे की वनस्पतीजन्य चरबीपासून, याची स्पष्ट माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारने अन्न व्यवसाय चालकांना निर्देश दिले आहेत.
एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांनी सांगितले की, उत्पादक, पुरवठादार, वितरक, केटरर्स, मिठाई दुकाने, तसेच हॉटेल-रेस्टॉरंट चालकांनी पनीर आणि मावा हे 'डेअरी' उत्पादन आहे की 'अनालॉग', हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
हा नियम केवळ दुकानातील उत्पादनापुरता मर्यादित नसून संपूर्ण पुरवठा करणाऱ्यांना लागू आहे. त्यामुळे बिल, चलन आणि इन्व्हॉइसवरही संबंधित उत्पादन 'डेअरी' किंवा 'अनालॉग' असल्याचे स्पष्ट नमूद करावे लागणार आहे.
मिठाई दुकानांनाही मिठाईच्या ट्रेवर स्पष्ट लेबल लावावे लागणार असून, त्यामध्ये वापरलेले पनीर किंवा मावा दूधजन्य आहे की अनालॉग आहे, याची माहिती ग्राहकांना दिसेल अशा पद्धतीने द्यावी लागणार आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार, 'अनालॉग' पनीर किंवा मावा तयार करण्यासाठी हायड्रोजनेटेड अथवा वनस्पतीजन्य तेलांचा वापर केला जातो आणि त्यात दुधाचा वापर नसतो.
त्यामुळे पनीर हा प्रथिनांचा स्रोत मानून सेवन करणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्षात वनस्पतीजन्य चरबीयुक्त उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. हायड्रोजनेटेड तेलांच्या अतिसेवनामुळे कोलेस्टेरॉल वाढण्यासह दीर्घकालीन आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात, असेही एफडीएने स्पष्ट केले आहे.
चार दिवसांची मुदत
एफडीएने अन्न व्यवसाय चालकांना नियमांचे पालन करण्यासाठी तीन ते चार दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत दुकानातील डिस्प्ले ट्रेवर योग्य लेबल लावणे, बिलांमध्ये आवश्यक बदल करणे आणि विक्रीसाठी आणलेल्या साठ्यावर योग्य लेबल असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी एफडीएचे अधिकारी नियमित तपासण्यांबरोबरच विशेष छाप्यांद्वारे करणार आहेत. उल्लंघन आढळल्यास उत्पादन जप्त करणे, मोठा दंड आकारणे, तसेच अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हेगारी कारवाईचा इशाराही एफडीएने दिला आहे.
रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे बंधनकारक
पनीर आणि माव्याचे अस्सल डेअरी उत्पादन असो किंवा त्याचा 'अनालॉग' प्रकार, दोन्ही उत्पादनांची संपूर्ण पुरवठा करण्याची तयारी होईपर्यंत सतत रेफ्रिजरेशनमध्ये साठवणूक करणे आवश्यक असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आगामी तपासण्यांमध्ये केवळ लेबलिंगच नव्हे, तर उत्पादनांच्या साठवणुकीच्या परिस्थितीचीही तपासणी केली जाणार आहे. ग्राहकांनी पनीर किंवा मावा घेताना ते दुधापासून तयार केलेले आहे की 'अनालॉग' आहे, याची माहिती लेबलवर तपासावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.