पणजी : पुढारी वृत्तसेवा
जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त सहनशक्ती स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धांच्या आयोजनापासून ते व्यावसायिक वॅॉलीबॉल लीग आणि मॅनॅथॉन स्पर्धपर्यंत, गोवा क्रीडा पर्यटनाचा सक्षम परिसंस्था विकसित करत आहे. जगभरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि क्रीडा समुदायांना आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केले.
एका कार्यक्रमात बोलताना मंत्री खंवटे म्हणाले की, समुद्रकिनारे, चैतन्यमय संस्कृती आणि पाहुणचारासाठी ओळखले जाणारे गोवा आता पर्यटनाच्या एका नव्या आयामाला, म्हणजेच क्रीडा पर्यटनाला चालना देत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांचा समावेश आपल्या वार्षिक क्रीडा दिनदर्शिकेत वाढत्या प्रमाणात करत, हे राज्य भारतासह परदेशातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, प्रेक्षक आणि क्रीडा समुदायांना आकर्षित करण्यासाठी नवीन संधी निर्माण करत आहे. या वाढत्या सहभागामुळे गोव्याच्या पर्यटनाला नवी दिशा मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राईम वॉलीबॉल लीगचा पाचवा हंगाम ३० नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. गोव्याच्या गोवा गार्डियन्ससह एकूण दहा फ्रँचायझींचा समावेश असलेली ही व्यावसायिक लीग भारतातील आघाडीची वॉलीबॉलपटू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणते.
राज्याच्या क्रीडा पर्यटनाला नवा आयाम मिळण्यासोबतच देशातील क्रीडाप्रेमींशी जोडले जाण्याची संधीही उपलब्ध होत आहे. असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. वास्को येथे १३ डिसेंबर रोजी एसकेएफ गोवा रिव्हर मॅरॅथॉनची सोळावी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेत भारतासह परदेशातील ७५००हून अधिक धावपटू सहभागी होतील, अशी माहिती खंवटे यांनी दिली.
आगामी प्राईम वॅॉलीबॉल लीगचा पाचवा हंगाम आणि डिसेंबरमध्ये होणारी एसकेएफ गोवा रिव्हर मॅरॅथॉन या स्पर्धांमुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्रात क्रीडा पर्यटनाचे महत्त्व वाढत आहे. आयरनमॅन ७०.३ गोवा २०२६ या स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीत मिमार येथे तीनहून अधिक देशांचे प्रतिनिधित्व करणारे दोन हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. गोव्याला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या राज्याच्या क्रीडा पर्यटनाला चालना देत आहे, असे त्यांनी नमूद केले.