सिडको (नाशिक ): सिडकोतील सावतानगरामधील महालक्ष्मी चौक येथे भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या सभेचे बुधवारी (दि.१४) आयोजन करण्यात आले होते. या सभेत तरुणाने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फलक झळकावला.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फलक प्रकरणाची मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आ. पडळकर यांच्यासोबत बोलणे झाले असून पोलिसांना याची माहिती देण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकारावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. ज्यांनी फलक झळकवले त्यांच्यावर कारवाई होईलच, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
काश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप हिंदू पर्यटकांवर झालेल्या जिहादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवर झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर तसेच धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त सकल हिंदू समाज प्रणित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने सिडकोत 'हिंदू विराट सभा'चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. पडळकर बोलत होते. सभेत एका तरुणाने गँगस्टर बिश्नोईचे फलक झळकावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. गुन्हेगाराचे फलक झळकावत त्याची पाठराखण करण्याचाच प्रकार होत असल्याची चर्चा परिसरात रंगली. फलक झळकावण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची शहर पोलिसांनीही गंभीर दखल घेतली. सभेला पोलिस बंदोबस्त असताना फलक झळकावत तरुण वर्गाने चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात होती. दरम्यान, या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान, त्यांनी सांगितले की, गुन्हेगारांचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. फलक झळकावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात आदेश दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मात्र याप्रकरणी अंबड पोलिस गुरुवारी (दि.१५) रात्रीपर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती.
सभेमध्ये कुख्यात गॅगस्टॉर गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकल्याच्या घटनेचा अहवाल पोलिसांच्या विशेष शाखेला पाठविण्यात आले आहे. या घटनेबाबत कायदा नसला तरी जर वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत कारवाई केली जाईल.राकेश हांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे] ,नाशिक.