नाशिक : जन्मदात्यानेच मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, पंचवटी पोलिसांनी पित्याविरोधात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली आहे.
११ वर्षीय मुलीच्या तक्रारीनुसार, तिच्या पित्याने १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अत्याचार केला. त्यानंतर २ मार्च रोजी पुन्हा प्रयत्न केला. मात्र, मुलीने विरोध केल्याने तिला मारहाण करण्यात आली. पीडितेने ही बाब परिसरातील एका महिलेच्या कानावर घातली. या महिलेने घटनेचे गांभीर्य ओळखून चाइल्ड लाइनला माहिती दिली. चाइल्ड लाइनच्या हस्तक्षेपानंतर पीडितेची चौकशी करून तिला मानसिक आधार देण्यात आला. त्यानंतर पंचवटी पोलिस ठाण्यात पित्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.
संशयित हा मोलमजुरी करतो. त्याला ५ ते १८ वयोगटांतील पाच मुले-मुली आहेत. पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. तो मुलांसोबतच राहतो. त्यातून त्याने हे नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले. पीडितेने हिमतीने दुसऱ्या महिलेला ही बाब सांगितल्याने या घटनेस वाचा फुटली.