Girish Mahajan Pudhari
नाशिक

Girish Mahajan | नातेवाईक दोषी असला तरी गय करणार नाही : महाजन

Girish Mahajan | सिंहस्थ बनावट कार्यादेश प्रकरणात सात-आठ जण पोलिसांच्या रडारवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी तब्बल ६०० कोटी रुपयांचे बनावट कार्यादेश तयार करून फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार असून, सात ते आठ जण या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे.

दोषी कितीही मोठा असला किंवा नातेवाईक असला तरी उसकी गय केली जाणार नाही, असा इशारा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सिंहस्थच्या कामांसाठी कार्यादेश मिळाल्याचा दावा करणारे काही जण आपल्याकडे आले होते. त्यांच्याकडील कागदपत्रे संशयास्पद वाटल्याने आपणच पोलिस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या, असे महाजन यांनी सांगितले.

सिंहस्थ आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनासही हा प्रकार आणून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून हे बनावट कार्यादेश तयार करण्यात आले होते. आदेशाची प्रत गेडाम यांना पाठवल्यानंतर त्यांनी असे कोणतेही कार्यादेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली.

सदर प्रकरणात १०० कोटी, १५० कोटी रुपयांचेही बनावट कार्यादेश तयार करून दिल्याचे समोर आले आहे. काहींनी ग्रामसेवक, तलाठी असल्याचे सांगून पैसे उकळल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे आल्या आहेत. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.

दूरचा नातेवाईक असल्याची कबुली

सदर प्रकरणातील आरोपींमध्ये काही भाजप कार्यकर्ते किंवा नातेवाईक असल्याबाबत विचारले असता महाजन यांनी, यातील एक जण माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याचे नाव तनय महाजन आहे. तो सुरुवातीपासूनच वाया गेलेला असून, यापूर्वीही त्याच्यावर अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल आहेत, असे सांगितले. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येऊ शकतात. पोलिस आयुक्त स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नातेवाईक असो अथवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्ती, कोणालाही सोडले जाणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT